मुंबई: शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी पत्रकारांना दिली. शिवसेनेकडून काही स्तरावर चर्चा आहे. पण चॅनलच्या माध्यमातून पाहिलं तर वाटतं चर्चा बंद आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं. शिवसेनेसोबतच सरकार स्थापन व्हावं ही भाजपाची इच्छा आहे. अल्पमतातील सरकार कदापि बसवणार नाही. दिल्लीहून तशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीनंच भाजपानं आत्तापर्यंत वाट पाहिली आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.

या पार्श्वभूमीवर, नितीन गडकरींनी भाजपाचं म्हणणं कसं योग्य आहे, हे पटवून दिलं. भारतीय जनता पक्षाचे १०५ आमदार निवडून आलेत आणि शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. युती किंवा आघाडीत ज्यांचे जास्त आमदार, त्यांचाच मुख्यमंत्री होत असतो, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. थोडक्यात, भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रिपदावर तडजोड करण्याच्या मनःस्थितीत नसल्याचंच त्यांनी सूचित केलं आहे. शिवसेनेशी चर्चा सुरू आहे आणि राज्याच्या हिताचा मार्ग लवकरच निघेल, असंही त्यांनी नमूद केलं.

गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीबाबत गडकरी यांना प्रश्न विचारला असताना गडकरी म्हणाले की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राजकारणाशी काहीही देणेघेणे नाही. त्यांचा संबंध राजकारणाशी जोडणे योग्यही नाही. नितीन गडकरी हे राज्याच्या राजकारणातील भारतीय जनता पक्षाचे बडे नेते मानले जातात. गडकरी यांचे सर्वच पक्षांमधील नेत्यांशी मैत्रीचे संबंध आहेत. शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी मुख्यमंत्रिपदासाठी नितीन गडकरी यांच्या नावावर सहमत होऊ शकते अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राज्यातील सत्तापेच कठीण बनला असताना मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन भूमिका स्पष्ट केली असताना, आज गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक एकाच व्यासपीठावर येत आहेत.

मुंबईत सत्तास्थापनेचा तिढा सुरू आहे. तो सुटत नसताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी रात्री अचानक मुख्यमंत्री नागपुरात दाखल झाले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन त्यांना सत्तासंघर्षाची माहिती दिली. त्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सरसंघचालकांना भेटणार आहेत. स्वर्गीय विलास फडणवीस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘जिव्हाळा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि जिव्हाळा पुरस्कार वितरण कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजता सायंटिफिक सोसायटीच्या सभागृहात होणार आहे. तिथे दोघेही उपस्थित राहणार आहेत. ते काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवसेनेशिवाय सरकार स्थापनेचा दावा करु नका असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी रात्री नागपूरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. या घडामोडींशी संबंधित असलेल्या जवळच्या सूत्राच्या हवाल्याने मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार बनवणार असेल तर त्यांना सरकार स्थापन करु द्या. विरोधी पक्षात राहून जनतेची सेवा करण्यासाठी तयार राहा. घोडेबाजाराच्या घाडेरडया राजकारणात पडू नका. दीर्घकाळाचा विचार करता भारतीय जनता पक्षासाठी ते हिताचे राहणार नाही असे भागवत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.

युती किंवा आघाडीत ज्यांचे जास्त आमदार, त्यांचाच मुख्यमंत्री असतो: नितीन गडकरी