21 November 2019 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

शिवसेनेने भाजपसोबतचे केंद्रापासून सर्व राजकीय संबंध तोडावे; राष्ट्रवादीची अट?

NCP President Sharad Pawar, Shivsena, Minister Arvind Sawant, Uddhav Thackeray, MP Sanjay Raut

मुंबई: विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्यानं मुख्यमंत्रिपदाबद्दल ‘प्रचंड आशावादी’ असलेल्या शिवसेनेसमोर राष्ट्रवादीनं एक ‘अवजड’ आणि ‘अवघड’ अट ठेवल्याचं समजतं. राज्यात राष्ट्रवादी शिवसेनेला साथ देईल. मात्र त्यासाठी शिवसेनेनं भाजपासोबतचे सर्व संबंध तोडावेत. केंद्रात अवजड उद्योग मंत्रालय सांभाळणाऱ्या अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी अट राष्ट्रवादीकडून घालण्यात आल्याचं पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितल्याचं वृत्त ‘मुंबई मिरर’नं प्रसिद्ध केलं आहे.

राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्ष दहाव्या दिवशीही कायम असल्यामुळे एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी एनसीपी’च्या निवडक नेत्यांची शनिवारी पेडर रोडवरील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली असे सांगण्यात येत असले तरी शरद पवार यांनी राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. पवार हे आज, रविवारी सायंकाळी दिल्लीला जात असून, ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची रविवारीच किंवा सोमवारी भेट घेतील, असे एनसीपी’च्या एका नेत्याने सांगितले.

तत्पूर्वी, मुख्यमंत्रीपदही वाटून घेण्याचे ठरले नव्हते या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यानंतर सत्तावाटपाच्या चर्चेचे गाडे रुळावरून घसरले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत रोजच भारतीय जनता पक्षावर शरसंधान साधून, शिवसेनेला अन्य पर्याय खुले असून काँग्रेस-एनसीपी’च्या पाठिंब्यावर सरकार येऊ शकते, असे इशारे देत आहेत. लोकसभा निवडणुकीत युती होण्याआधीही राऊत यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचे भारतीय जनता पक्षाचे धोरण होते. मात्र आता राऊत अतिरेक करीत आहेत, अशी भारतीय जनता पक्ष नेत्यांची भावना असून शिवसेना नेतृत्व त्यांना रोखत नसल्याने भारतीय जनता पक्षानेते नाराज आहेत.

पंतप्रधान मोदी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा नेहमीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय हालचालींचा बारीसारीक तपशील ते रोज घेत आहेत. पण शिवसेनेनं आपल्यावर फक्त टीकाच करायची आणि आपण त्यांचे सर्व लाड पुरवायचे हे यापुढे होणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्या कृतीतून दिला आहे.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(205)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या