मुंबई: राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी थोडक्यात भाष्य केले. त्यावेळी शिवसेनेचे संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली असं कडक शब्दांत सांगितलं. तसेच शिवसेना सत्तेसाठी हिंदुत्वापासून देखील दूर गेली असं भाष्य करत, शिवसेनेवर ताशेरे ओढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी पुन्हा एकदा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. राज्याच्या जनादेशाला नकारात शिवसेनेने दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू झालं. राज्यात अनेक प्रश्न आज उभे आहेत. त्यांच्यामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. लवकरच आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करू असंही ते म्हणाले.

यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले की, राज्यात शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे. तीन्ही पक्षांच्या बैठकांचे सत्र काही संपत नव्हते. यामुळे आम्ही भाजपासोबत दोन पक्षांचे सरकार स्थापने करायचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा.

संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली: चंद्रकांत पाटील