मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शहा उद्या संध्याकाळी ६ वाजता मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आगामी निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेची युतीसाठी पुन्हा बोलणी सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाना आगामी निवडणुकीचे नकारात्मक संकेत मिळताच जवळीक साधली जाऊ शकते.
या भेटीची गुप्तता पाळण्यात येत असली तरी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हजर राहणार असल्याचे समजते. दोन्ही पक्षांमधील ताणलेले संबंध लक्षात घेता भाजपच्या वरिष्ठांनी मातोश्रीकडे कानाडोळा केला होता. पालघर निवडणुकीत झालेला पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आणि होत्या नव्हत्या त्या अपेक्षा सुद्धा संपल्या अशी चर्चा होती.
केवळ भाजपलाच युती हवी होती असं नाही तर शिवसेनेतील सुद्धा एका मावळ गटाच्या नेत्यांना युती हवी होती अन्यथा लोकसभा निवडणूक कठीण जातील अशी चर्चा शिवसेनेअंतर्गत रंगली होती. आता स्वतः भाजप अध्यक्षांनी पुढाकार घेतल्याने युतीच्या चर्चेला भाजपने सुरुवात केली आम्ही नाही असं कारण आता शिवसेनेला चालून आलं आहे.
भाजपसाठी कर्नाटक विधानसभा निवडणूक धडा शिकवून गेली आणि राजकारणात कशी गणित फिरू शकतात याची प्रचिती आली आहे. त्यामुळे सर्वच राज्यांतील विरोधक कर्नाटकमधील रणनीती वापरू लागली तर २०१९ मध्ये भाजपचा सुपडा साफ होऊ शकतो याची प्रचिती भाजपच्या वरिष्ठांना आली आहे.
आधीच विरोधक एक होत आहेत आणि त्यात सिद्ध मित्र पक्ष वेगळे झाले तर भाजपसाठी २०१९ हे फारच कठीण जाऊ शकत असं चित्र आहे. त्याचाच प्रत्यय म्हणजे उद्या स्वतः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत.
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. शिवसेना एकला चलो रे या भूमिकेवर ठाम असून उद्धव ठाकरे सुद्धा भूमिकेवर ठाम राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
दुसरी महत्वाची बाजू अशी आहे की साधारणतः कोणी अधोरेखित करत नाहीत आणि ती म्हणजे भले शिवसेनेने स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे तरी जसा चंद्रा बाबुंचा टीडीपी पक्ष केवळ मंत्रिमंडळातूनच नाही तर एनडीएमधून सुद्धा बाहेर पडला आहे तसा एनडीएतून बाहेर पडण्याचा कोणताही निर्णय शिवसेनेकडून झालेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या मनात काय आहे ते सुद्धा काही प्रमाणात दिसून येते.
