नाशिक : नाशिक मोहाडी येथे ही घटना घडली असून रामभाऊ लोंढे या पानटपरी मालकाने सरपंच सुरेश गावित यांच्याकडे विडी, सिगारेटच्या आधीच्या शिल्लक उधारीचे पैसे मागितल्याचा रागाने सुरेश गावित यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह पुन्हा टपरीवर जाऊन मुद्दाम कुरापती काढल्या आणि त्यानंतर सुरेश गावित यांनी रागाने पानटपरीला टपरीला आग लावली, अशी तक्रार रामभाऊ लोंढे यांनी केली आहे.
केवळ जुन्या विडी, सिगारेटच्या उधारीचे पैसे मागितल्याने सरपंच सुरेश गावित यांनी ही टोकाची भूमिका घेतल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. सरपंच सुरेश गावितहे हे शिवसेनेचे स्थानिक नेते आहेत. त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे पानटपरी मालक रामभाऊ लोंढे यांनी विडी, सिगारेटच्या उधारीला नकार दिल्यानंतर सुद्धा सरपंच सुरेश गावित हे बळजबरीने वस्तु नेत होते असं रामभाऊ लोंढेनी स्पष्ट केलं आहे. परंतु शुक्रवारी सुरेश गावित हे पुन्हा उधारीवर विडी, सिगारेट घेण्यासाठी गेले असता रामभाऊ लोंढेनी नकार देताच गावित यांनी टपरीमालकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर राग मनात ठेऊन गावित पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांसह टपरीवर गेले आणि मुद्दाम कुरापती काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुरेश गावित यांनी थेट पानटपरीला आग लावण्याची मजल गाठली.
त्यानंतर काही वेळाने आग विझवण्यासाठी गावातीलच बंब मागवून आजूबाजूच्या गावकऱ्यांच्या मदतीने पानटपरीला लावलेली आग विझवण्यात आली. रामभाऊ लोंढे यांनी पोलिसांत रीतसर तक्रार केल्यानंतर सरपंच सुरेश गावित यांनी सुद्धा पानटपरी मालकाविरोधात उलट तक्रार दाखल केली आहे.
