मुंबई : इंटरनॅशनल ट्रॅव्हल हाऊस ह्या कंत्राटदाराने आय.टी. सी. मराठा पंचतारांकित हॉटेल अंधेरी आणि आय.टी. सी. ग्रँड सेन्ट्रल परेल मधील त्यांच्या एकूण २०० कामगारांना कमी करण्याच्या घाट घातला होता. भाजप संबंधित कामगार युनियनचे सदस्य असलेले हे सर्व २०० कामगार १ सप्टेंबर २०१८ पासून नोकरीवरून कमी केल्यामुळे घरी बसून होते.
विशेष म्हणजे भाजप संबंधित कामगार संघटनांना हाताशी धरूनच कंपनीच्या व्यवस्थापनाने त्यांना कामावरून कमी करण्याचा घाट घातल्याने त्यांच्याशी संबंधीत संघटनांनी व्यवस्थापनाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास मनाई केली. अखेर या सर्व कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण आणि सरचिटणीस गजानन राणे यांची भेट घेऊन त्यांच्या सर्व अडचणी मांडल्या.
त्यानंतर राज ठाकरेंच्या आदेशाने गजानन राणे ह्यांनी काल इंटरनॅशनल ट्रॅव्हल हाऊस ह्या कंत्राटदाराच्या कंपनी व्यवस्थापनाबरोबर सविस्तर चर्चा केली आणि आणि त्यांना कामगार कायद्याची आणि त्या अंतर्गत तरतुदींची आठवण कंपनी व्यवस्थापनाला करून दिली. त्यानंतर सर्व म्हणजेच २०० कामगारांना कंत्राटदाराने पुन्हा कामावर रुजू करण्याचे मान्य करून घेतले आणि त्याहीवर म्हणजे कामगार कायद्यानुसार विश्रामगृह आणि इतर तत्सम सोई सुविधा मिळेपर्यंत कामगारांना घरी बसून पगार देण्याचे कंत्राटदाराने मान्य केले आहे. त्यानंतर सुखावलेल्या कामगारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे आभार मानले.
