जकार्ता : सध्या इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा चांगली झाली आहे. टेनिसपटू अंकिता रैनाने टेनिस महिला एकेरीत कांस्यपदक पटकावलं आहे.
त्यामुळे भारताच्या खात्यातील अजून पदकांमध्ये अजून एका कांस्य पदकाची भर पडली आहे. उपांत्य फेरीत अंकिताला चीनच्या झ्यांग शुईकडून पराभव स्वीकारावा लागला होता. शुईने अंकितावर ४-६, ७-६ अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
तर दुसरीकडे टेनिसमध्ये पुरुषांच्या दुहेरी प्रकारात भारताची रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण ही जोडी अंतिम फेरीत पोहचली आहे. अत्यंत अटीतटीच्या या लढतीत बोपण्णा-शरण जोडीने जपानच्या प्रतिस्पर्धी जोडीवर ४-६, ६-३, १०-८ अशी मात केली. या विजयामुळे भारताच्या खात्यात किमान एक रौप्यपदक निश्चीत झालं आहे.