मुंबई : डीजे आणि डॉल्बीवरील बंदीबाबत राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात ठाम राहिल्याने तसेच पर्यावरणाला हानिकारक अशा आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या डीजे आणि डॉल्बीला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणे अशक्यच असल्याचे ठाम मत न्यायालयात मांडल्याने गणेशोत्सवात देखील डीजेचा आवाज बंदच राहणार हे नक्की झालं आहे.

आज मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे डीजे आणि डॉल्बी मालकांना तसेच रसिकांना धक्का बसला आहे. याआधीच गणेशोत्सवा दरम्यान गोंगाटाला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी डीजे तसेच डॉल्बी अशा कर्कश आवाजाच्या वाद्यांना परवानगी नाकारली आहे. त्याविरोधात प्रोफेशनल ऑडिओ अॅण्ड आणि लाइटनिंग असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवादा करताना मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, पोलिसांनी डॉल्बी आणि डीजेला परवानगी नाकारण्यापूर्वी कोणताही प्रकारचा अभ्यास केला नाही. तसेच यापूर्वी पोलिसांनी आवाजाची मर्यादा ओलांडणारे फटाके वाजवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत का?. त्यात लाइव्ह कॉन्सर्ट व इनडोअर कार्यक्रमांमध्ये डीजे आणि डॉल्बीला सऱ्हास परवानग्या दिल्या जातात. परंतु, सार्वजनिक ठिकाणीच अशी बंदी का, असा सवाल याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवादा दरम्यान उपस्थित केला होता. परंतु न्यायालयाने या याचिकेवरील निर्णय राखून ठेवल्याने डीजे आणि डॉल्बी मालकांचा तसेच शौकीन रसिकांचा हिरमोड झाला आहे.

Bombay high court hold the decision on petition against Dolby and DJ