बुद्धिबळ हा खेळ आजपासून १५०० वर्षांपूर्वी शोधला गेला असा उल्लेख बऱ्याच पुस्तकातून केलेला आढळतो. बुद्धिबळ या खेळाची सुरवात भारतातच झाली. मी वाचलेल्या अनेक पुस्तकात बुद्धिबळाचा शोध कसा लागला यावर विविध तर्क वितर्क केले आहेत. असे मानले जाते कि उत्तर भारतात या खेळाची सुरवात झाली. जेव्हा तेथील स्थानिक राजा लढाईवर जात असे तेव्हा त्याची राणी त्याला एका पाटावर लढाई कशी लढावी याची व्यूहरचना करून देत असे. त्यातूनच मग पुढे याने खेळाचे रूप घेतले. चतुरंग हा खेळ सैन्याच्या चार अंगाने बनलेला – पायदळ, घोडदळ, हत्ती आणि रथ. चतुरंग या खेळाची लोकप्रियता वाढत गेली आणि मग तोच पर्शिया आणि युरोपात पोचला. चतुरंग, बुद्धिबळ, शतरंज आणि मग चेस अश्या नावांनी ओळखला जाणारा हा खेळ आज जगात सर्वात जास्त खेळल्या जाणाऱ्या इनडोअर खेळांपैकी एक आहे.

कालांतराने बुद्धिबळाच्या नियमांमधे बदल होत गेला. मंत्री (म्हणजे सध्याचा वजीर) हा फक्त तिरपे एक घर जाऊ शकत होता. उंट (त्या काळचा हत्ती) फक्त तिरपी दोन घरे जाऊ शकत होता. १८५० नंतर या खेळात काही ठराविक बदल करून त्याचे माणकीकरण करण्यात आले. आणि एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्पर्धात्मक खेळाची सुरवात झाली. १८८६ मध्ये ऑस्ट्रियाच्या विल्हेल्म स्टेनिझ ने बुद्धिबळ विश्व-विजेता हा खिताब जिंकला. बुद्धिबळाच्या खेळातील तोच सर्वात पहिला विश्व-विजेता आहे. याच विश्वविजेत्यांच्या यादीत १५वे नाव आहे भारताच्या विश्वनाथन आनंद चे. विश्वनाथन आनंद ने २००२ ते २०१२ या दहा वर्षांच्या काळात  ५ वेळा जगज्जेते पद मिळवले. 

बुद्धिबळ हा खेळ सर्वसामान्य माणसाला कंटाळवाणा वाटणे साहजिक आहे परंतु एकदा खेळाची समज व आवड निर्माण झाली कि त्या पासून लांब राहणे कठीणच आहे. बुद्धिबळ या खेळाची एक झलक तुम्हाला त्या खेळाची चटक लावू शकते असे म्हणणे काही अयोग्य ठरणार नाही. बुद्धिबळ या  खेळाचे अनेक फायदे हि आहेत. वृद्धपकाळात होणारा अल्झायमर (स्मृती भ्रंश) हा रोग बुद्धिबळ खेळल्यामुळे होत नाही असा अभ्यास काही तज्ज्ञांनी सिद्ध केला आहे.तसेच शिक्षणात हि बुद्धिबळ खेळल्याने बरेच फायदे होऊ शकतात असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबईतील एका बुद्धिबळ विशेष  कार्यक्रमात बोलत असताना विश्वनाथन आनंदने बुद्धिबळाबद्दल त्याचे विचार व्यक्त केले.  “बुद्धिबळ या खेळामुळे तुमची एकाग्रता वाढते. गणित, विज्ञान या सारख्या काठिण विषयांचा अभ्यास करताना त्याचा विशेष फायदा होतो. बुद्धीबळ हे तर्कावर आधारित असते, त्यामुळे तर्कावर आधारित गणिते सोडवण्यात त्याची मदत होते. या शिवाय नेहमी सर्व कामे तुम्ही आत्मविश्वासाने करू शकता. फक्त एवढेच नाही तर बुद्धिबळ खेळल्याने तुमची स्मरणशक्तीही मोठ्या प्रमाणात वाढते. फक्त बुद्धिबळाच नाही तर कुठल्याही स्पर्धेला तुम्ही धैर्याने सामोरे जाऊ शकता” असे आनंदने सांगितले.

बुद्धिबळ कोणत्या वयात शिकले पाहिजे? खेळाडू आणि प्रशिक्षक असल्यामुळे मला अनेक पालक हा प्रश्न विचारतात. माझ्या अनुभवाप्रमाणे वयाच्या चौथ्या किव्वा पाचव्या वर्षांपासून बुद्धिबळाचे  प्रशिक्षण घेणे योग्य आहे. कारण त्या वयापासून मुलांची आकलनशक्ती वाढत असते. बुद्धिबळ हा खेळ फक्त खेळ नसून एक कला आणि विज्ञान यांचा मेळ आहे. लहान मुले किव्वा मोठी माणसे सर्वांनीच हा खेळ शिकून या खेळाचा आनंद घेतला पाहिजे.

लेखक – अमर गोडबोले,
बुद्धिबळ खेळाडू आणि प्रशिक्षक

बुद्धिबळ एक विस्मयकारक खेळ!