नवी दिल्ली : बँक कर्ज घोटाळा प्रकरणी आयसीआयसीआयच्या बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची सोमवारी तब्बल ८ तासांहून अधिक काळ अंमलबजावणी संचालनालयाने कसून चौकशी केली. त्याच्याविरोधातील बँक कर्जघोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ते ईडीसमोर उपस्थित झाले होते. सकाळी ११ वाजता चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झालेल्या कोचर दाम्पत्यांनी सुटका रात्री ८च्या सुमारास करण्यात आली.

काय आहे संबंधित प्रकरण?

२००९ मध्ये चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर असताना नियम धाब्यावर बसवून तसेच स्वतःच्या पदाचा गैरवापर करत वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन उद्योगसमूहाला २००९ ते २०११ या काळात चंदा कोचर यांनी वेगवेगळी कारणे दाखवत तब्बल १५७५ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. ज्यानंतर धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या व्यवसायात ६४ कोटी रुपयांचे भांडवल गुंतवले. त्यानंतर कर्ज घेताच व्हिडीओकॉन उद्योग समुहाने ३० जून २०१७ साली कंपनीचे दिवाळे निघाल्याचे जाहीर केले. व्हिडिओकॉन कंपनीला कर्ज देताना चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका सीबीआयने ठेवत याप्रकरणी चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह एकूण ५ जणांवर गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ऑक्टोबर २०१८ मद्ये चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

व्हिडिओकॉन बँक कर्ज घोटाळा: ईडीकडून चंदा कोचर यांची ८ तास कसून चौकशी