वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाचे (NASA) “इनसाइट” (इंटरिअर एक्सप्लोरेशन यूजिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन) यानाने मंगळावर यशस्वी लँडिंग केले आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहिती नुसार सोमवार आणि मंगळवारच्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री एक वाजून २४ मिनिटांनी इनसाइट यान मंगळ ग्रहावर यशस्वीरीत्या उतरले आहे.

दरम्यान, नासाकडून या ऐतिहासिक क्षणांचे थेट प्रक्षेपण सुद्धा करण्यात आले होते. सदर यान हे विशेषकरून मंगळ ग्रहावरील विविध रहस्य समजून घेण्यासाठी बनवण्यात आले आहे. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर यान उतरताना १९८०० किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारे हे यान ६ मिनिटांत शून्य वेगावर आले. त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि मंगळावर यशस्वी तसेच सुखरूप लँड झाले. या ऐतिहासिक क्षणांचे पहिले छायाचित्र सुद्धा नासाने सार्वजनिक केले आहेत.

तब्बल ६ महिन्यांच्या प्रवासानंतर इनसाइटने मंगळावर यशस्वी लँडिंग केले. नासाने या महत्वकांक्षी प्रोजेक्टसाठी तब्बल १ बिलियन डॉलर म्हणजेच ७० अब्ज रुपये खर्ची लावले आहेत. सौर ऊर्जा तसेच बॅटरीने ऊर्जा मिळवणाऱ्या या लँडरला २६ महिन्यांपर्यंत चार्ज करता येईल. असे असले तरी नासाला त्यापेक्षा अधिक काळासाठी ते कार्यान्वित राहू शकेल अशी आशा आहे.

नासाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, इनसाइट यान पृष्ठभागावर दहा ते सोळा फुट खोल खड्डा करेल. तत्पूर्वीच्या मंगळ अभियानांच्या तुलनेत हे १५ टक्के अधिक खोल भागात असेल. २०३० सालापर्यंत मनुष्याला मंगळावर पाठवण्याच्या प्रयत्नासाठी नासाला मंगळ ग्रहाचे तापमान समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

NASAs insight lander successfully touches down on mars