नवी दिल्ली : RBI गव्हर्नर उर्जित पटेल हे राजीनामा देऊ शकतात असे वृत्त सध्या प्रसार माध्यमांवर झळकत आहे आणि तसे झाल्यास नरेंद्र मोदी सरकारच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात. सध्या स्वायत्ततेच्या प्रश्नावरून RBI आणि मोदी सरकार दरम्यान तणाव वाढत असून RBIच्या कर्मचारी संघटनेने सुद्धा केंद्राला त्या संदर्भात लेखी पत्र लिहिले आहे.
मागील २ दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी RBI च्या धोरणावर सडकून टीका केली होती. दरम्यान, २००८ ते २०१४ दरम्यानच्या कालावधीत, बँकांकडून झालेल्या अनिर्बंध कर्जवाटपाला नियंत्रित करण्यात RBIची भूमिका अपयशी ठरल्याची टीका अर्थमंत्र्यांनी केली होती. तसेच बँकिंग क्षेत्रातील आजच्या बुडीत कर्जाच्या (NPA) समस्येचे खापर सुद्धा अर्थमंत्र्यांनी रिझव्र्ह बँकेवरच फोडले होते.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी मुंबईतील ए.डी. श्रॉफ या व्याख्यानमालेत मागील आठवड्यात अर्थव्यवस्थेबाबत RBI कायम दीर्घकालीन विचार करत असते, असे सांगत केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्यानंतर RBI आणि मोदी सरकारमधील संबंध तणाव पूर्ण असल्याचे दिसते आहे.
त्यामुळेच बुधवारी गव्हर्नर उर्जित पटेल त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. RBI गव्हर्नर उर्जित पटेल हे मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रचंड नाराज असल्याचे वृत्त ‘सीएनबीसी टीव्ही १८’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. उर्जित पटेल यांनी या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजीनाम्यासह सर्व पर्याय खुले ठेवल्याचे या वृत्तात म्हटले आहे. तर दुसरीकडे मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राने उर्जित पटेल हे राजीनामा देणार नाही, असे म्हटल्याने प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झाला आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		