नवी दिल्ली: भारतातील आघाडीच्या खासगी दूरसंचार कंपन्यांपैकी एक असलेल्या व्होडाफोनने भारतातून गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. व्होडाफोन कंपनीला भारतात मोठा तोटा सहन करावा लागत असून त्यामुळेच ही कंपनी भारतातील सेवा बंद करण्याची शक्यता असल्याचे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान, कंपनीकडून यावर अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
दोन वर्षांपूर्वी रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर मोफत कॉलिंग आणि अन्य सुविधांमुळे इतर दूरसंचार कंपन्यांचे धाबे दणाणले होते. तर काही कंपन्यांना या शर्यतीत टिकाव धरता आला नसल्यानं त्यांनीदेखील आपला व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला होता. तसंच यानंतर व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांचं मर्जरदेखील झालं होतं. सध्या व्होडाफोन आणि आयडिया या दोन्ही कंपन्या एकत्रित सेवा पुरवत आहे. परंतु आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार व्होडाफोन कोणत्याही क्षणी आपला भारतातील व्यवसाय बंद करण्याची शक्यता आहे. ऑपरेशनल लॉस आणि कॅपिटलायझेशनमध्ये आलेली कमी यामुळे कंपनी हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामुळेच कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटादेखील सहन करावा लागत आहे.
व्होडाफोन इंडिया व आयडिया सेल्युलर या कंपन्यांच्या विलीनीकरणाला राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाने (NCLT) परवानगी दिली. त्यानंतर ३१ ऑगस्ट २०१८ रोजी या दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण झालं. या विलीनीकरणानंतर व्होडाफोन-आयडिया ही नवी मोबाइलसेवा पुरवठादार कंपनी जन्माला आली. या विलीनीकरणामुळे भारती एअरटेल ही कंपनीसुद्धा दुसऱ्या स्थानावर फेकली गेली. अंबानींच्या जिओने मोबाइलसेवेत केलेल्या नवनव्या प्रयोगानंतर व्होडाफोन व आयडिया या कंपन्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. या दोन्ही कंपन्यांवर कर्जाचा बोजा वाढत असल्यानं अस्तित्वासाठी त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		