मुंबई : बॉलिवूडमधील कलाकरांना जितकी प्रसिद्धी मिळते तितकंच त्यांना समाज माध्यमांवरील ट्रोलिंगला देखील मोठ्या प्रमाणावर सामोरं जावं लागतं. नुकतंच अभिनेत्री दिशा पटानीला युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंसोबत पाहण्यात आले होते. दरम्यान या गोष्टीमुळे दिशाला समाज माध्यमांवर भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या ट्रोलिंगमध्ये मुख्यतः बॉलिवूड कलाकार टायगर श्रॉफचा उल्लेख होता. ‘एक था टायगर’पासून ते ‘टायगर जिंदा है’ अशा अनेक कंमेंट्स नेटकाऱ्यांनी केल्या आणि दिशा पटानीला हैराण करून सोडले होते. या सगळ्या ट्रोलिंगला दिशाने देखील प्रतिउत्तर दिलं आहे.
दिशाने चाहत्यांच्या या प्रश्नांना तिच्या भाषेत उत्तर दिलं आहे. त्यात तिने म्हटलं आहे की, “दोन मित्र जेवणासाठी एकत्र जाऊ शकत नाहीत का? मैत्री करताना आपण लिंगाचा विचार करत नाही. माझ्या फक्त मैत्रिणीच नाही तर मित्र देखील आहेत. प्रत्येकालाच मित्र व मैत्रिणीही असतात.” दिशा असंही म्हणाली की, मी असं करियर निवडलं आहे की जिथे मी कायमच लोकांच्या नजरेत राहणार आहे. लोक नेहमी माझ्याबद्दल स्वतःची मतं बनवणारच आहेत. त्यामुळे मी त्याकडे फारसे लक्ष देत नाही.”
मुंबईतील एका हॉटेलबाहेर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंना पुन्हा एकदा अभिनेत्री दिशा पटानीसोबत स्पॉट करण्यात आलं होतं. ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘बागी २’ यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेल्या दिशासोबत यापूर्वीदेखील आदित्य ठाकरे एका डिनरसाठी गेले होते. त्यावेळी त्यांची प्रचंड चर्चा झाली होती. दिशाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ या चित्रपटामध्ये झळकली होती. या चित्रपटामध्ये तिने एक महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली आहे.
