नारायणपूर (छत्तीसगड): इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दलातील (ITBP) एका जवानानं आज, बुधवारी सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात ६ जवान ठार झाले, तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर त्यानं स्वतःवरही गोळी झाड़ून आत्महत्या केली. छत्तीसगड येथील नारायणपूर जिल्ह्यात ही घटना घडली. त्यांच्यात सुट्टीवरून वाद झाल्याचं समजतं.

गोळीबार करणाऱ्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या जवानांचा एकूण आकडा सातवर पोहचला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जवानावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जवानांमधील वादाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र सुट्टी न मिळाल्यामुळे आरोपी जवान नाराज होता. यावरुनच त्यांच्यामध्ये वाद झाल्याची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

नारायणपूर येथील पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांच्या माहितीनुसार, इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दलातील जवानांमध्ये आज सकाळी जोरदार वाद झाला. यातून झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला. यात आणखी दोन जवान जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रहमान खान या कॉन्स्टेबलनं आपल्या पाच सहकारी जवानांवर गोळीबार केला.

मृत्युमुखी पडलेल्या जवानांची नावे

  1. मसुदुल रहमान – प. बंगाल
  2. महेंद्र सिंह – हिमाचल प्रदेश
  3. सुरजीत सरकार – प. बंगाल
  4. दलजीत सिंह – पंजाब
  5. विश्वनाथ महतो – प. बंगाल
  6. बीजीश – केरळ

सीमा पोलीस दलातील सहकाऱ्यांचा एकमेकांवर गोळीबार; ६ जवानांचा मृत्यू