नवी दिल्ली: आर्टिफिशल इंटेलिजन्स, रोबोटिक्ससारख्या क्षेत्रांमध्ये चीननं मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आपण मंदिर, मशिदीच्या गोष्टी करत राहिल्यानं केवळ वेळ फुकट जाईल. धर्म, जातपात विसरुन एक देश म्हणून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता असल्याचं मत माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या प्रेम भाटिया स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.
स्वातंत्र्यानंतर आपण विविध भेदाभेदांमध्ये अडकून पडलो. कधी धार्मिक, कधी भाषिक तर कधी जातीपातीचे वाद समोर येत गेले. यात आपली बरीच उर्जा खर्च झाली, असं प्रकाश म्हणाले. ‘देशाला मागे नेणारे वाद वारंवार उकरुन काढण्याची नव्हे, तर ते कायमस्वरुपी संपवण्याची आवश्यकता आहे. चीनमध्ये सध्या आर्टिफिशयल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता), रोबोटिक्स आणि मशीन लर्निंगची चर्चा सुरू आहे. त्या दृष्टीनं संशोधनदेखील केलं जात आहे. अशा परिस्थितीत आपण जर मंदिर आणि मशिदीवर बोलणार असू तर त्या केवळ निरर्थक गप्पा ठरतील,’ असं प्रकाश म्हणाले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी लष्करी कारवायांचं श्रेय लाटणे, सैनिकांच्या फोटोसह पोस्टर झळकणे, लष्कराच्या गणवेशातील पक्षाच्या कार्यकर्त्यांचे फोटो, विशेषतः हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या फोटोचा राजकीय फायद्यासाठी करण्यात येणाऱ्या वापरावर माजी सैनिकांनी राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे चिंता व्यक्त केली होती. या पत्रावर तब्बल आठ माजी लष्कर प्रमुखांच्याही सह्या होत्या. त्यात जनरल सुनीत फ्रान्सिस रॉड्रिग्ज, शंकर रॉय चौधरी, दीपक कपूर, ऍडमिरल लक्ष्मीनारायण रामदास, विष्णू भागवत, अरुण प्रकाश, सुरेश मेहता आणि एअर चीफ मार्शल एन. सी. सुरी यांचा समावेश होता.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक प्रचार सभेत सेनेचा उल्लेख ‘मोदीजी की सेना’ असा केला होता. त्यावरही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती. अशा बाबी राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या अखंडतेला मारक ठरू शकतात. सुरक्षा दलांची निधर्मी आणि अराजकीय अशी प्रतिमा जपण्यासाठी ठोस पावलं उचलावीत, असं आवाहन त्यांनी राष्ट्रपतींना केलं होतं.
तसेच माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर ‘टॅक्सी’सारखा केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने वादळ उठले असताना ऍडमिरल (सेवानिवृत्त) एल. रामदास यांनी एक पत्रक जारी करून तपशीलवार माहिती देत मोदींचा दावा फेटाळून लावला होता. युद्धनौकेचा वापर राजीव यांनी ‘फॅमिली पिकनिक’साठी केल्याचा दावा तथ्यहीन असल्याचे नमूद करत त्या अधिकृत शासकीय दौऱ्यात पंतप्रधानांसोबत त्यांच्या पत्नीशिवाय कुटुंबातील अन्य कुणीही सदस्य नव्हता, असे रामदास यांनी स्पष्ट केले होते. आयएनएस विराटवर सेवा बजावणाऱ्या नौदलाच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडील इनपुट्स घेऊन त्याआधारे रामदास यांनी हे पत्रक जारी केले होते. त्यानंतर भाजप तोंडघशी पडली होती.
