मुंबई : पूर्वी तंत्रज्ञनाचा सुळसुळाट नसल्याने समाज हा एकमेकांशी थेट जोडलेला होता. त्यामुळे नातेवाईक आणि मित्र मंडळी सुद्धा एकमेकांच्या परिवारांसोबत जोडले गेले होते. अशा परिस्थितीत विवाह जुळवणे आणि लग्नासाठी इच्छुक स्थळ शोधणे सोपं होतं. त्याचं मुख्य कारण होतं ते समाज एकमेकांच्या थेट संपर्कात असायचा. तसेच गरजा मर्यादित असल्याने काही ठराविक गोष्टी इच्छेनुसार असतील तर विवाह सुद्धा लवकर जुळणं सोपं असायचं. परंतु, आज परिस्थिती फार कठीण होताना दिसत आहे. त्यामुळे एकूणच बदलेल्या परिस्थितीमुळे विवाह व्यवस्था सुद्धा फार कठीण गोष्ट होऊन बसली आहे.
आज सर्वात महत्वाचं म्हणजे तंत्रज्ञानामुळे समाज एकमेकांपासून केवळ तांत्रिक दृष्ट्या जोडला गेला आहे. परिणामी वधू-वरांचे शोध सुद्धा ऑनलाईन केले जाऊ लागले आहेत. पूर्वी लग्न व्यवस्थेत स्थळ म्हणून मध्यस्ताच जवाबदारी घेऊन विवाह जुळवणारी मंडळी सुद्धा लुप्त होताना दिसत आहेत. त्याचं मूळ कारण म्हणजे आज कोणीही दुसऱ्याची खात्री आणि जावबदारी घेण्यास तयार होत नाही. त्यामुळेच आमच्या मुलासाठी किंवा मुलींसाठी स्थळ बघा असं म्हटलं तरी लोकं हो हो करून दुर्लक्ष करणं पसंत करतात.
त्यात रोजच्या गरजा इतक्या वाढल्या आहेत की त्यासाठी घरात आणि घराबाहेर सुद्धा खूप पैसा खर्च करावा लागतो. परिणामी विवाह स्थळ शोधताना सुद्धा वधू असो किंवा वर, सर्वांच्याच अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या दिसत आहेत. त्यात वधूंच्या बाजूने असणारी स्वतःच घर किंवा स्वतःचा फ्लॅट आणि त्यात भरघोस पगाराची नोकरी असणारा वर हवा असल्याने अनेक जण तर लग्नाचा विचार करताना सुद्धा घाबरतात. सध्याची दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई आणि गरजा विचारात घेतल्यास, त्या वधूंना किंवा त्यांच्या कुटुंबियांना तरी किती दोष द्यावा हा सुद्धा प्रश्न येतोच.
ग्रामीण भागात तर सरकारी नोकरी असणारा मुलगा हवा अशी सर्वाधिक अपेक्षा असल्याने इथे सुद्धा काही परिस्थिती फार सादी-सोपी राहिलेली नाही. ग्रामीण आणि शहरी भागात सुद्धा अनुरूप वधू-वर शोधताना प्रचंड अडचणी येताना दिसत आहेत. त्यात देशातील जनगणनेनुसार पुरुष आणि महिला यांच्या आकडेवारीत बरीच तफावत असल्याने भविष्यात विवाह व्यवस्था अतिशय कठीण होताना दिसेल यात शंका नाही. अगदी १-२ लाख महिना पगार आणि स्वतःच घर असताना सुद्धा एखादी व्यक्ती लग्न जुळत नाही, असं सांगते तेव्हाच विवाह व्यवस्थेतील अडचणी बरंच काही सांगून जात आहेत.
