मुंबई: भाजपा आणि शिवसेना यांनाच जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनीच सरकार स्थापन करावं बाकी याबाबत बोलण्यासारखं काहीही नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार मुंबईतल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपा आणि शिवसेना युतीला जनतेने कौल दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करावं आणि आम्हाला जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

तत्पूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या सिल्वर ओक इथल्या निवासस्थानी अवघ्या दहा मिनिटं दोन्ही नेत्यांची भेट झाली. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत मातोश्रीला रवाना झाले. “ही नेहमीप्रमामे सदिच्छा भेट होती. परंतु राज्यातील अस्थिर स्थितीबाबत शरद पवारांनी चिंता व्यक्त केली,” अशी माहिती संजय राऊत यांनी भेटीनंतर माध्यमांना दिली.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांवर राज्यातील स्थितीवर चर्चा झाली. राज्यातील अस्थिर स्थितीवर शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. राज्यात लवकर सत्ता स्थापन व्हावी असं शरद पवारांना वाटतं. त्यांचे ठाम मत आहे की, राष्ट्रवादी-काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्याचं जनतेने कौल दिला आहे असं त्यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे आता भाजपाला सोडून सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेची कोंडी झाल्याचे उघड आहे.

दरम्यान यानंतर राज्यातील सत्तास्थापनेवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. मुख्यमंत्रिपदावर ठाम असणाऱ्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. सत्ता स्थापनेचा तिढा सोडविण्याबाबत या दोन्ही नेत्यांची फोनवरुन चर्चा झाली.

भाजपा-शिवसेनेनेच सरकार स्थापन करावं: शरद पवार