मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या सिल्वर ओक इथल्या निवासस्थानी अवघ्या दहा मिनिटं दोन्ही नेत्यांची भेट झाली. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत मातोश्रीला रवाना झाले. “ही नेहमीप्रमामे सदिच्छा भेट होती. परंतु राज्यातील अस्थिर स्थितीबाबत शरद पवारांनी चिंता व्यक्त केली,” अशी माहिती संजय राऊत यांनी भेटीनंतर माध्यमांना दिली.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांवर राज्यातील स्थितीवर चर्चा झाली. राज्यातील अस्थिर स्थितीवर शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. राज्यात लवकर सत्ता स्थापन व्हावी असं शरद पवारांना वाटतं. त्यांचे ठाम मत आहे की, राष्ट्रवादी-काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्याचं जनतेने कौल दिला आहे असं त्यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे आता भाजपाला सोडून सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेची कोंडी झाल्याचे उघड आहे.
Shiv Sena leader Sanjay Raut after meeting NCP chief Sharad Pawar, in Mumbai: He is a senior leader of the state & the country. He is worried about the political situation in Maharashtra today. We had a brief discussion. pic.twitter.com/PtXzll0rRC
— ANI (@ANI) November 6, 2019
काँग्रेसमधील राज्यातील नेते शिवसेनेसोबत सकारात्मक झाले होते. त्यांनी पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर पवारांनी देखील सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. पण त्यानंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया देत आम्हाला विरोधात बसण्यासाठी कौल दिल्याचे सांगितले. पण भाजपाला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत जावे असे राज्यातील नेत्यांचे मत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका बदलू शकते अशी सेनेला आशा होती. मात्र ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने प्रतिक्रिया दिली आहे आणि राष्ट्रवादीने भूमिका बदलली त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. त्यामुळे भाजपा सोबत हातमिळवणी करावी किंवा वेगळा संसार मांडावा याशिवाय शिवसेनेसोबत दुसरा पर्याय नाही.
काल भाजपकडून शिवसेनेसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी आधी ठरल्याप्रमाणे करा अशी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. शिवसेनेची ही भूमिका पहिल्या दिवसापासून संजय राऊत मांडत आहेत. राज्यातील या राजकीय घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेस देखील महत्त्वाची भूमिका बजावत होती. मात्र आता खेळ पूर्ण पालटला आहे असच म्हणावं लागेल.
