श्रीनगर : पुलवामामधील पिंगलान येथे काल भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीसंदर्भात भारतीय सैन्य दल आणि सीआरपीएफने आज एक संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली. दरम्यान, १०० तासांच्या आतमध्ये १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांचा खात्मा करण्यात आला, अशी माहिती भारतीय लष्कराने यावेळी दिली. तसेच जम्मू काश्मीरमधील पालकांना कळकळीचे आवाहन आणि विनंती देखील करण्यात आली, ‘दहशतवादाच्या मार्गावर जाणाऱ्या आपल्या पाल्यांना समजवा आणि माघारी बोलवा.

चुकीच्या मार्गावर गेलेल्या मुलांना समर्पण करायला लावा, असे आमचे जम्मू काश्मीरमधील मातांना आवाहन आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांसाठी आम्ही कित्येक चांगले उपक्रम राबवत आहोत. पण हातात बंदूक घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही’. दरम्यान, पुलवामा हल्ल्यामध्ये ISIचा हात होता, ISIच्या मदतीने ‘जैश-ए-मोहम्मद’ने हल्ला केला, असा मोठा खुलासादेखील भारतीय लष्कराने यावेळेस केला.

पत्रकार परिषदेमध्ये सीआरपीएफ, जम्मू काश्मीरचे पोलीस वरिष्ठ पोलील अधिकारीदेखील सहभागी झाले होते. चिनार कॉर्प्सचे लेफ्टनन्ट जनरल के.जी. ढिलन्न, श्रीनगरचे आयजी एसपी पाणी, CRPFचे आईजी जुल्फिकार हसन आणि GoC विक्टर फोर्सचे मेजर जनरल मैथ्यू यांचा पत्रकार परिषदेत समावेश होता.

indian army and crpf held press conference on pulwama pinglan encounter issue