हैदराबाद : तेलंगणा येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार सोयम बापूराव यांनी एक वादग्रस्त विधान केल्याने देशभर चर्चा रंगली आहे. जर कोणी मुस्लीम युवक आदिवासी मुलींच्या पाठीमागे लागला असेल तर त्याचे शिर कापून टाकलं जाईल असं वादग्रस्त विधान त्यांनी केलेलं आहे. आदिलाबाद येथील खासदार सोयम बापूराव यांचा एक व्हिडीओ व्हायरल झालेला आहे त्यात ते असं विधान करताना दिसत आहेत.
व्हिडीओ क्लीपमध्ये खासदार सोयम बापूराव म्हणतात की, मी मुस्लीम युवकांनो सांगतो. जर तुम्ही आदिवासी मुलींच्या मागे लागलात तर तुमचा शिरच्छेद करु, मी माझ्या जिल्ह्यातील अल्पसंख्याक युवकांना बजावून सांगतोय की आमच्या मुलींचा पाठलाग करु नका असं धमकीवजा इशारा खासदारांनी दिला आहे.
सोमवारपासून ही व्हिडीओ क्लीप समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाल्याने भारतीय जनता पक्षाचे खासदार सोयम बापूराव खूप अडचणीत आले आहेत. ज्यात त्यांनी मुस्लीम युवकांना जर आम्ही तुमचा पाठलाग केला तर तुम्हाला अडचणीचं जाईल असा इशारा दिला. या व्हिडीओवरुन अल्पसंख्याक समुदायाकडून भारतीय जनता पक्षाचे खासदार सोयम बापूराव यांच्याविरोधात लेखी तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. खासदारांच्या विधानामुळे मुस्लीम समुदायाच्या भावना दुखावल्या असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तसेच वादग्रस्त विधान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
