नवी दिल्ली : उन्नाव सामूहिक बलात्कारपीडितेचा रात्री उशिरा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. पाच जणांनी पीडितेला जिवंत पेटवून दिलं होतं. यात ती ९० टक्के भाजली होती. सफदरजंग रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी पीडितेचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री १०.४० वाजताच्या सुमारास पीडितेचे निधन झाले. तिला एअरलिफ्ट करत दिल्लीला हलविण्यात आले होते. ९० टक्के भाजलेली असूनही ती शुद्धीत होती. यावेळी तिने तिच्यासोबत असलेल्या भावाला मी वाचणार ना? मला मरायचे नाही, असे अश्रू ढाळत सांगितले होते. जवळपास ४० तास तिने मृत्यूशी झुंज दिली होती. तिच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांचे अश्रू थांबत नाहीत. रडतानाही पीडितेच्या वयोवृद्ध बापाने मलाही हैदराबादप्रमाणेच न्याय हवाय, अशी मागणी केलीय.

दरम्यान, आपल्याला मुलीच्या मृत्यूची सुचना देण्यात आली नव्हती, असंही तिच्या वडिलांकडून सांगण्यात आलं. तसंच आरोपींना हैदराबादमधील आरोपींप्रमाणेच शिक्षा देण्यात यावी किंवा त्यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. प्रसार माध्यमांना त्यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली. नराधम आरोपींना शिक्षा मिळाल्यानंतरच आपल्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभेल, असंही ते म्हणाले.

Uttar Pradesh Unnav Gangrape Victim Father Demands Same Kind of Punishment like Hyderabad Rape Accused

हैदराबादमधील आरोपींप्रमाणेच त्यांनाही शिक्षा देण्यात यावी; उन्नाव पीडितेच्या वडिलांची मागणी