लखनऊ : उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील अतरुआ गावानजीक भीषण अपघात झाला असून या अपघातात उन्नाव सामूहिक बलात्कार पीडित तरुणी आणि वकील गंभीर जखमी झाले आहे. तसेच बलात्कार पीडित तरुणीची काकी आणि मावशी यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून हा अपघात की घातपात अशी चर्चा सुरु झाली आहे.

एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, उन्नाव बलात्कार घटनेमधील पीडितेचा काका (चाचा) महेश सिंह तुरुंगामध्ये बंद आहेत. त्यांना भेटण्यासाठी पीडिता, तिची आई, मावशी, काकू (चाची) आणि वकील महेंद्र सिंह रायबरेलीला जात होते. याच दरम्यान अतरुआ गावाजवळ त्यांच्या कारची ट्रकशी समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत कारच्या ठिकऱ्या उडाल्या. अपघातामध्ये पीडितेची मावशी आणि काकूचा जागीच मृत्यू झाला, तर पीडिता, तिची आई आणि वकिलाला लखनौच्या ट्रामा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार कुलदीपसिंग सेंगर व त्यांच्या साथीदारांनी जून २०१७ मध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. याप्रकरणी न्याय मिळावा यासाठी युवती व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (८ एप्रिल २०१८) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु, उन्नाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी ते मरण पावले.

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयनं भारतीय जनता पक्षाचे आमदार कुलदीप सिंह सेनगरला ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्याविरोधात ३ गुन्हे दाखलदेखील करण्यात आले होते. भारतीय दंडसंहितेच्या कलम ३६३ (अपहरण), ३६६ (महिलेचे अपहरण), ३७६ (बलात्कार), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं.

उन्नाव बलात्कार घटनेमधील पीडितेच्या गाडीला अपघात; आरोपी भाजप आमदार असल्याने घातपाताचा संशय