प्रयागराज : विश्व हिंदू परिषदेच्या दोन दिवसीय धर्मसंसदेला आजपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरुवात झाली आहे. अयोध्येतील बहुचर्चित राम मंदिराच्या उभारणीवर या धर्म संसदेत सखोल चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आजच्या या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत, योगगुरू बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर आणि स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हजेरी लावणार आहेत.
दरम्यान, या धर्म संसदेमुळे राम मंदिराच्या उभारणीसाठी आता मोदी सरकारवर प्रचंड दडपण आल्याचे वृत्त आहे. कारण, शंकराचार्यांसोबत साधुसंत २१ फेब्रुवारी रोजी राम मंदीरासाठी पहिली वीट रचनार असल्याचे वृत्त आहे. त्यानिमित्ताने १० फेब्रुवारी पासूनच साधुसंत प्रयागराजमधून अयोध्येकडे कूच करतील असं सांगण्यात येते आहे. कारण शंकराचार्य स्वरूपानंद यांनी बोलाविलेल्या धर्मसंसदेत हा प्रस्ताव सुद्धा सर्वमताने मान्य करण्यात आला आहे.
त्यानुसार १० फेब्रुवारी म्हणजे वसंत पंचमीनंतर साधू संत अयोध्येच्या दिशेने रवाना होतील. त्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी पहिली वीट रचली जाईल असं धर्मसभेत स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यानंतर राम मंदिराच्या उभारणीसाठी साधुसंत आंदोलनाला सुरुवात करतील. तसेच आंदोलनादरम्यान कुणी आडवे आल्यास साधुसंत गोळ्या झेलण्यास सुद्धा तयार असल्याचे धर्मसभेत सांगण्यात आले आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून याबाबत कोणती विशेष खबरदारी घेण्यात येते ते पाहावे लागणार आहे.
