न्यूयॉर्क : अमेरिकेशी चीनची चर्चा फिस्कटली असून अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्ध आता अधिकच विकोपाला जाण्याची शक्यता आहे. व्यापार व्यवहार वाचविण्यासाठी झालेल्या अंतिम बैठकीदरम्यान अमेरिकेने २०० अब्ज डॉलरच्या चीनी उत्पादनांवरील आयात कर १० टक्क्यांनी वाढवून तो तब्बल २५ टक्के इतका वाढवला आहे. त्यामुळे आता चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के आयातकर आकारला जाणार आहे. मात्र चीननेदेखील यावर योग्य ती कारवाई केली जाईल अशी थेट धमकी ट्रम्प प्रशासनाला दिली आहे.
चीन चर्चेपासून मागे हटत असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्याला त्याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिल्यामुळे चीनची चांगलीच कोंडी झाली. अमेरिका चीनवर नवीन कर लावण्यापासून परावृत्त होणार नाही, असे अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींच्या कार्यालयाने स्पष्ट केले. 200 अरब डॉलरच्या आयातीवर शुक्रवारपासून कर वाढविण्यात आला.
दहा टक्केवरून आता कर पंचवीस टक्के करण्यात आला आहे. या मुद्दावर चर्चा करण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार २ दिवसांच्या चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु चीनचे उपपंतप्रधान लियु हे आणि अमेरिकेच्या व्यापारी अधिकार्यांची चर्चा झाली नाही. यावरून चीन चर्चेला तयार नसल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. जर चीन अमेरिकेत समझोता करार झाला नाही तर त्याची किंमत त्याला चुकवावी लागेल. दरवर्षी १०० अरब डॉलर वसूल करावे लागतील. त्यावर चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते गाओ फेंग यांनी स्पष्टीकरण दिले.
