ह्यूस्टन: अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साधेपणाचं दर्शन ह्यूस्टनमध्ये घडलं. विमानतळावर मोदींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. त्याचवेळी जमिनीवर फूल पडल्याचं मोदींच्या लक्षात आलं. त्यांनी स्वतः जमिनीवरील फुल उचललं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका आठवड्याच्या अमेरिका दौऱ्यासाठी शनिवारी रात्री उशीरा अमेरिकेच्या ह्यूस्टन शहरात दाखल झाले. भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी ह्यूस्टन येथे दाखल झाले आहेत. ह्यूस्टन येथे ‘टेक्सास इंडिया फोरम’कडून आज ऐतिहासिक ‘हाउडी मोदी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याची जय्यत तयारी सुरू आहे. नरेंद्र मोदींच्या या कार्यक्रमाला ५० हजारांपेक्षा अधिक अमेरिकी-भारतीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेत होणाऱ्या सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक असल्याचं सांगितलं जात आहे.

हाऊडी मोदी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ११०० हून अधिक स्वयंसेवक रात्रंदिवस एक करुन काम करत आहेत. अमेरिकेतील ४८ राज्यांतील भारतीय समुदाय पंतप्रधान मोदींना ऐकण्यासाठी ह्यूस्टन येथे पोहोचत आहे. हाऊडी मोदी कार्यक्रमात ६० हून अधिक अमेरिकन सासंद सहभागी होण्याची शक्यता आहे. सुरुवातीचा सांस्कृतिक कार्यक्रम साधारण ९० मिनिटांचा असेल. या सांस्कृतिक कार्यक्रमात भारत-अमेरिकी समुदायाची विविधता दिसून येईल.

हाऊडी मोदी हा कार्यक्रम ह्युस्टन येथे आयोजित होण्याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे या शहरात मोठ्या प्रमाणावर असलेले भारतीय वंशांचा नागरिकांचे प्रमाण होय. टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात मोठ्या प्रमाणावर भारतीय राहतात. ह्युस्टनप्रमाणेच डल्लास या शहरामध्येही भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. ही दोन्ही शहरे अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असलेल्या शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत यापूर्वीही अशा कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प या कार्यक्रमाला खास उपस्थित राहण्यामागे त्यांचा स्वार्थही आहेच. पुढील वर्षी म्हणजे २०२०मध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका होतायत. भारतीय अमेरिकींची मतं या निवडणुकीत महत्वाची ठरतात. ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षातर्फे राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे उमेदवार म्हणून आधीच जाहीर झाले आहेत.

‘टेक्सास इंडिया फोरम’ हे ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाचे आयोजक आहेत. मात्र, भाजपचा परराष्ट्र व्यवहार विभाग आणि पीएमओ या व्यवस्थेची देखरेख करीत आहेत. तीन तासांचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पीएमओ नियमितपणे व्हाईट हाऊसच्या संपर्कात आहे. असे संकेत मिळत आहेत की, ट्रम्प हे ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात पूर्ण वेळ थांबणार नाहीत. दोन्ही देशांतील तणाव दूर करण्यासाठी ट्रम्प काही घोषणा करू शकतात. ह्युस्टनमध्ये गुजराती समुदायाचे समर्थन प्राप्त करण्यासाठी भाजपचे गुजरातमधील ३२० आमदार आणि काही खासदार यापूर्वीच ह्युस्टनमध्ये दाखल झाले आहेत. डेमोक्रॅटिकचे वरिष्ठ सदस्य स्टेनी होयरसह 60 पेक्षा अधिक अमेरिकी संसद सदस्य सहभागी होतील.

#हाऊडी मोदी : ट्रम्प येणार कारण पुढील वर्षी अमेरिकेत होणारी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक