
Gratuity Calculator | कोणत्याही कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पगारासह ग्रॅच्युईटी रक्कम मिळते. एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीमध्ये पाच वर्षांपेक्षा जास्त काम केले असेल तर, तो ग्रॅच्युईटीसाठी पात्र ठरतो. आपल्या कामाचे अनेक वर्ष कंपनीला दिल्याबद्दल नियोक्ता कर्मचाऱ्याला बक्षीस स्वरूपात ग्रॅच्युईटी प्रदान करते. ही ग्रॅच्युईटीची रक्कम कर्मचारी नोकरी सोडतो तेव्हा त्याला दिली जाते.
दरम्यान प्रत्येकजण नोकरी सोडल्यावर आपल्याला ग्रॅच्युईटीची किती रक्कम मिळेल याचा विचार करत असतो. आज आम्ही तुम्हाला या बातमीपत्रातून ग्रॅच्युइटी मोजण्याचे सूत्र सांगणार आहोत. या सूत्रामुळे तुम्ही अगदी सहजरीत्या कॅल्क्युलेशन करून योग्य रक्कम मिळवू शकता.
नोंदणी नसलेल्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना देखील मिळते ग्रॅच्युईटी :
प्रत्येक कंपनीची ग्रॅच्युईटीची पद्धत वेगवेगळी असू शकते. दरम्यान ग्रॅच्युईटीच्या कायद्यानुसार ज्या कंपन्या नोंदणीकृत आहेत त्यांना पुरेपूर ग्रॅच्युईटीचा लाभ घेता येतो. परंतु ज्या कंपन्या ग्रॅच्युइटी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत नसतात अशा कंपन्या स्वतःच्या इच्छेने कर्मचाऱ्याला ग्रॅच्युईटी प्रदान करतात. परंतु या ग्रॅच्युइटीची रक्कम नोंदणीकृत कंपन्यांच्या तुलनेत कमी असते. अशा परिस्थितीमध्ये वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या सूत्रानुसार ग्रॅच्यूइटी रक्कम ठरवली जाते.
ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेट करण्याचे सूत्र :
पुढील सूत्रानुसार तुम्ही अगदी सहजरित्या तुमची ग्रॅच्युइटी रक्कम मोजू शकता. सूत्र – (शेवटी मिळालेला पगार) × (कंपनीमध्ये काम केलेल्या एकूण वर्षांची संख्या) × (15/26). या सूत्राप्रमाणे कंपनीमधील तुमच्या शेवटच्या 10 महिन्यांमध्ये मिळालेल्या पगाराची सरासरीबरोबरच, मूळ वेतन, कमिशन आणि महागाई भत्ता त्या सर्वांचा समावेश केला जातो. एका महिन्यामध्ये चार रविवार असतात. त्यामुळे 26 दिवस मोजले जातात आणि 15 दिवसांनुसार ग्रॅच्युइटी रक्कम मोजली जाते.
15 वर्ष काम आणि 75,000 पगार असेल तर, एवढी ग्रॅच्युइटी मिळेल :
वरील दिलेल्या ग्रॅच्युइटी सूत्राच्या आधारे कॅल्क्युलेशन करताना तर, तुम्ही कंपनीमध्ये एकूण 15 वर्ष काम केले असेल आणि तुमचा शेवटचा पगार 75,000 हजार रुपयांएवढा असेल तर, (75,000)×(15)×(15/26) असे असेल. आता संपूर्ण कॅल्क्युलेशन पाहता तुम्हाला दिली जाणारी ग्रॅच्युईटीची रक्कम 6,49,038 रुपये एवढी असेल. तर, अशा पद्धतीने ग्रॅच्युईटीचे सूत्र वापरून तुम्ही तुमच्या मूळ वेतनावरून काम सोडल्यानंतर मिळणारी ग्रॅच्युइटी रक्कम मोजू शकता.