मुंबई : भारतीय जनता पक्ष समर्थकांनी एका फेसबूक पेजवर चिले कुटुंबियांचा फोटो त्यांना न विचारताच वापरत मोदी सरकारचे लाभार्थी म्हणून झळकवले असल्याची पोलखोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. मात्र या सगळ्याबाबत प्रतिक्रीया देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे, चिले कुटुंबियांचा पाकिस्तानशी थेट संबंधच जोडला.

चिले कुटुंबियांचा फोटो असलेली बातमी ‘न्यू यॉर्क टाईम्स’सह पाकिस्तान डिफेन्स या वेबसाईटवर प्रसिद्ध झाल्याने या कुटुंबाचा संबंध तावडेंनी पाकिस्तानशी जोडला. मात्र तावडे स्वत:च्याच विणलेल्या जाळ्यात अडकले असून याच पाकिस्तान डिफेन्स वेबसाईटवर त्यांचा फोटो असलेली बातमी आढळून आली आहे.

२२ जुलै २०१५साली ही बातमी प्रसिद्ध झालेली असून या बातमीमध्ये तावडे यांचा फोटो आहे. यावर आता चिले कुटुंबियांनीही सवाल उपस्थित केला आहे. ‘पाकिस्तान डिफेन्स या वेबसाईटवर मुस्ताफीचा लेख होता. त्या लेखात माझे नाव होते म्हणून तावडेंनी आमचा संबंध पाकिस्तानशी लावला. आता तावडे यांची बातमीसुद्धा त्याच वेबसाईटवर सापडली आहे. त्यामुळे तावडेंसह भाजपाचा पाकिस्तानशी काही संबंध आहे का? ’ असा सवाल योगेश चिले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

‘मोदी फॉर न्यू इंडिया’ या फेसबुक पेजवर ‘मोदी है तो मुमकीन है’ या जाहिरातीत झळकलेल्या चिले कुटुंबियांना काळाचौकी येथे झालेल्या सभेत व्यासपीठावर आणून राज यांनी भाजप समर्थकांची पोलखोल केली होती. ‘भारतीय जनता पक्षाच्या लावारीस भक्तांकडून’ खोट्या पद्धतीचा प्रचार सुरु असल्याचा आरोप राज यांनी केला. परंतु, या सगळ्याबाबत प्रतिक्रीया देताना तावडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पाकिस्तानचा थेट संबंधच जोडला.

योगेश चिले आणि त्यांच्या कुटूं‍बीयांचा जो फोटो दाखविण्यात आला त्या फोटोच्या आधारे एक बातमी करण्यात आली, ही बातमी न्यूयॉर्क टाईम्स आणि पाकिस्तान डिफेन्स या वेबसाईटवर प्रसिध्द झाली आहे. कदाचित पाकिस्तान डिफेन्सचा यामध्ये संबंध नसेल पण पाकिस्तान आणि मनसेचं काय नातं आहे? असा सवाल तावडे यांनी उपस्थित केला आहे. मात्र आता तावडे यांची फोटोसहीत बातमी याच पाकिस्तानी वेबसाईटवर झळकल्याने तावडे याला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सविस्तर बातमी येथे क्लिक करून वाचा

तावडेंनी हे का लपवलं? स्वतःवरील घोटाळ्याच्या आरोपासंबंधित बातम्या त्या पाकिस्तानी वेबसाईटवर आहेत