मुंबई: नाथाभाऊ खडसे हे आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे. त्यांची अहवेलना झाली हे आम्हांला देखील आवडलेले नाही. अशी माणसे पक्षात आली तर आम्हाला आनंदच होईल. पक्षाला त्यामुळे बळकटी मिळेल,” असे मत राज्याचे मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

थोरात म्हणाले, ”नाथाभाऊ पक्षात आले तर आम्हाला आनंदच होईल. त्यांच्याकडून आम्हांला प्रस्ताव आलेला नाही आणि आम्ही देखील काही प्रस्ताव दिलेला नाही. पंकजा मुंडे चांगलं काम करत होत्या, त्यांची नाराजी मला माहित नाही. मात्र, इतकी नाराजी योग्य नाही, असेही थोरात यावेळी म्हणाले.

खडसे अनेक महिन्यांपासून पक्षावर नाराज आहेत. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आणि पक्ष सत्तेपासून दूर राहिल्यानंतर त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली आहे. आपल्या मनातील हीच खदखद ज्येष्ठ नेत्यांकडे व्यक्त करण्यासाठी खडसे दिल्लीला पोहोचले होते. मात्र, त्यांनी भाजपाच्या एकाही नेत्याची भेट घेतली नाही. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आज लोकसभेत होते. मात्र राज्यसभा खासदार असलेल्या कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांचीही खडसेंनी भेट घेतली नाही. त्यामुळे खडसे खरच वेगळा विचार करुन वेगळ्या पक्षाची वाट धरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाथाभाऊ पक्षात आले तर आम्हाला आनंदच : बाळासाहेब थोरात