परळी: २०१४ मध्ये राज्यात सत्तांतर घडल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये नेतृत्वावरून कुरघोडी सुरू झाली. मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना मागे टाकत देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली. त्यानंतर काही महिन्यांनी एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातूनही बाहेर पडावं लागलं. तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सर्व प्रचार देवेंद्र फडणवीस यांच्याभोवतीच फिरत होता. त्यामुळे निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापनेस अपयश आल्यानंतर नाराज नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

“शेटजी भटजींचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख होती. पण गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अण्णा डांगे, नितीन गडकरी अशा अनेक नेत्यांनी पक्षासाठी काम केलं आणि पक्षाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामुळे पक्षाची ओळख बहुजन समाजाचा पक्ष अशी बदलण्यात यश आलं. संघर्षाच्या कार्यकाळात गोपीनाथ मुंडे यांनी नेतृत्त्व केलं. त्यांचा सहकारी होतो याचा मला अभिमान आहे. पण चांगला कालखंड आला तेव्हा ते निघून गेले,” अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित, चंद्रशेखर बावनकुळे अशा अनेक नेत्यांची तिकिटे कापली. त्यामुळे पक्षात नाराजी वाढली आहे.

भारतीय जनता पक्षातील इतर मागासवर्गीय समाजातील नेत्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार खडसे काही दिवसांपासून करत आहेत. दरम्यानच्या काळात एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर खडसे प्रचंड नाराज असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर खडसेंनी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

 

Web Title:  Ekanath Khadse Slams Former Chief Minister Devendra Fadnavis at Gopinathgarh Speech

एकनाथ खडसे यांचं फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र