मुंबई : शिवसेना काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत महाविकास आघाडी’करून सत्तेत आली खरी, मात्र त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या विधानाने अधिकच राजकीय पेचात सापडत आहे असंच म्हणावं लागेल. अगदी काँग्रेसमध्ये सर्वजण शांत झाले की खासदार संजय राऊत कोणत्या ना कोणत्या तरी विधानाने शिवसेनेची अडचण वाढवताना दिसत आहे.

मात्र आता पुन्हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानाने शिवसेनेच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत. मुस्लिम समाजाने सांगितल्यामुळेच काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत आहे असं विधान अशोक चव्हाण यांनी केलं. सीएए विरोधात आयोजित रॅलीत त्यांनी केलेल्या धक्कादायक विधानानंतर आता राजकारण रंगलं आहे.

नांदेडमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध कऱण्यासाठी आयोजित रॅलीत बोलताना अशोक चव्हाणांचं हे धक्कादायक वक्तव्य चांगलंच वादात सापडलं आहे. भाजप हा मुस्लिमांचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं मुस्लिम समाजाने आपल्याला सांगितल्याचा दावा त्यांनी केला. मुस्लिमांनी सांगितल्यामुळेच काँग्रेस राज्यात सत्तेत सहभागी झाल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरुन भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी अशोक चव्हाण व शिवसेनेवर टीका केली आहे. तुमच्या महाविकास आघाडीमागे व सत्तास्थापनेमागे हेच उदिष्ट होते का? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडीने सरकार स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेस पक्षाविरोधात अनेकांनी सत्तेसाठी भूमिका बदलल्याचा आरोप केला होता. शिवसेनेसारखा विरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांबरोबर सरकार स्थापन करण्याची गरज काय, यामागे केवळ सत्ता लालसा असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांनी केला होता. काही दिवसांपूर्वी काॅंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकार स्थापनेपूर्वी एकत्रितपणे सरकार स्थापनेबाबत काॅंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्य़ा चर्चेचा खुलासा केला होता.

 

Web Title:  Former Chief Minister Ashok Chavan said for Muslim community we are with Shivsena.

केवळ मुस्लिमांच्या आग्रहामुळे काॅंग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत: अशोक चव्हाण