सिंधुदुर्ग : नाणार रिफायनरीमुळे या प्रकल्पांतर्गत धरण बांधण्यासाठी देवगड तालुक्यातील पंधरा गावे कणकवली तालुक्यातील दोन गावे प्रकल्पबाधित होणार आहेत.’नाणार रिफायनरी प्रकल्प हा कोकणचा नाश करणारा आहे, तसेच या प्रकल्पामुळे कोकणच्या निसर्गाला सुद्धा भविष्यात धोका निर्माण होणार आहे असं स्थानिकांच ठाम मत आहे.
त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात निघालेला या मोर्चाला हजारो स्थानिक गावकरी आणि प्रकल्प बाधित हजर होते. अगदी देवगड पासून ते राजापूरपर्यंतची लोकं या मोर्चात सामील झाली होती. या मोर्चाची सुरवात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयापासून झाली आणि हा मोर्चा थेट तहसीलदार वनिता पाटील यांच्या कार्यालयापर्यंत गेला.
या विनाशकारी प्रकल्पाने राजापूर देवगड कणकवली पर्यंत पाय पसरले असून त्यामुळे हजारो लोकं बाधित तर होणारच आहेतच, परंतु भविष्यात कोकणच्या निसर्गालासुद्धा मोठी हानी होणार असल्याचे आमदार नितेश राणे म्हणाले. आजचा मोर्चा हा शांततेत निघालेला शेवटचा मोर्चा असून या पूढे शासनाला लोकांच्या भावना आणि विरोध कळत नसेल तर यापुढे आम्ही यापुढे कायदा हातात घेण्यास सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. मग तुम्ही पोलीस बळ वापरा, आर्मी आणा; पण आमची ताकद आम्ही तुम्हाला सर्वजण मिळून सरकारला आमची ताकद दाखवून देऊ,” असा थेट इशाराच नितेश राणे यांनी दिला आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		