मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मातोश्रीवर आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची युती करताना जे ठरलं होतं ते व्हावं, बाकी काही अपेक्षा नाही असं सांगत मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान बैठकीनंतर आमदारांची फोडाफोडी होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना हॉटेल रंगशारदावर पाठवण्यात आलं आहे. सर्व आमदार दोन दिवस हॉटेल रंगशारदामध्ये राहणार आहेत.

‘सत्ता स्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतली तो सर्वांना मान्य असेल,’ असा एका ओळीचा ठराव या बैठकीत शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मान्य केला आहे. तसंच शिवसेना मुख्यमंत्रिपदच मिळावं, या मागणीबाबत सर्व आमदारांचं एकमत झालं आहे.

‘शिवसेनेचा मुख्यमंत्री होणं हा आमच्यासाठी सर्वोच्च आनंद असेल,’ असं शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही मातोश्रीच्या आदेशाचे भुकेलेलो आहोत, असं म्हणत शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी बैठकीनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच या बैठकीनंतर सर्व शिवसेना आमदारांना रंगशारदा हॉटेल इथं जाण्याचा आदेश पक्षाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळातही मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आक्रमकच राहणार अशी स्थिती आहे.

बैठकीनंतर बोलताना शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी हिंमत असेल तर आमचे आमदार फोडून दाखवावेत असं सांगत भाजपाला आव्हान दिलं आहे. “कोणी माई का लाल आम्हाला फोडू शकत नाही. आमदार म्हणजे काही भाजीपाला नाही. हिंमत असेल तर आमचे आमदार फोडून दाखवावेत,” असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सर्व आमदारांनी एकत्र राहायला हवं. त्यामुळे शिवसेनेचे आमदार रंगशारदा हॉटेलमध्ये जात असल्याची माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुखांच्या निर्णयामागे सर्व आमदार ठामपणे उभे राहतील, असंदेखील ते म्हणाले. तर आमदार फोडायचा प्रयत्न शिवसेना स्टाईलनं प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा उदय सामंत यांनी दिला.

दरम्यान, सत्तेतल्या ५०-५० टक्के वाट्यावर शिवसेना अजूनही ठाम असल्याचे दिसते. लोकसभेच्या वेळी युतीचं जे ठरलं होतं, तसंच व्हावं याचाच पुनरुच्चार या बैठकीत झाला, अशी माहिती या बैठकीनंतर आमदार शंभूराजे देसाई यांनी प्रसारमाध्यमांना दिली. शिवसेना प्रमुख जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण असू अशी ग्वाही या आमदारांनी उद्धव ठाकरे यांना या बैठकीत दिली. आमदारांना मुंबई सोडण्याचे आदेश नाहीत, त्यांना पुढील निरोप येईपर्यंत रंगशारदा येथेच थांबायचे आहे.

कोणीही उचलून न्यायला आमदार म्हणजे मंडईतील भाजी आहे काय? सेना आ. गुलाबराव पाटील