मुंबई : सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचे प्रकार सध्या शिवसेनेत नवीन नसलं तरी त्यात अनेकांची भर पडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात १३ युतीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र त्यापैकी शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार तानाजी सावंत यांना मिळालेल्या मंत्रीपदावरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली होती.
सावंत यांना मिळालेल्या मंत्रीपदावरून निलेश राणेंनी शिवसेनचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्राला भिकारी बनवण्याचे वक्तव्य करणा-या व्यक्तीला जर मंत्रिमंडळात संधी मिळत असेल तर, महाराष्ट्राचे यापेक्षा मोठ दुर्दैव कोणते अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगली होती. २०१७ मध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील प्रचारादरम्यान, ‘सव्वाशे-दीडशे कोटींचा कारखाना खरेदी करायला मला फारसे काही लागत नाही. काही लोकांचा गैरसमज झाला असेल की तानाजी सावंत भिकारी-बिकारी झालाय. पण तसे काही नाही. हा गैरसमज काढून टाका. मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण तानाजी सावंत कधीही भिकारी बनणार नाही,’ असे सावंत म्हणत असल्याचे व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर त्यांचावर मोठ्याप्रमाणात टीका सुद्धा झाली होती.
दरम्यान तेच मंत्रीपदी विराजमान झालेले तानाजी सावंत आता सत्ताधारी असून देखील सत्ताधाऱ्यांना टीका करण्याचा शहाणपण करत असल्याने समाज माध्यमांवर टीकेची झोड उठत आहे. राज्यात सध्या भाजप-सेना युतीचे सरकार आहे. परंतु येत्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावर दोनही पक्षातील नेते दावा करत आहेत. अशातच शिवसेनेचे नेते आणि जलसंपदामंत्री तानाजी सावंत यांनी भाजपला टोला लगावला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये भूम परांडा वाशी रहिवाशांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना सावंत यांनी ‘आज प्रत्येक क्षणाला सावध राहण्याची गरज आहे. आम्ही गाफिल नाही. जर कोणाला या सत्तेचा किंवा कोणत्या गोष्टीचा माज असेल, तो माज उतरवण्याची हिंमत सुद्धा आमच्या शिवबंधनात आहे. त्यामुळे आम्हाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडायचं नाही,असा इशारा भाजपला दिला आहे. दरम्यान पुढे बोलताना ‘एकला चलो रे अथवा युती ठेवायची की नाही हा सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील’ तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीच नव्हे पंतप्रधान झालेलं ही मला आवडेल. पण हा निर्णय स्वतः पक्षप्रमुख घेतील असंही विधान सावंता यांनी केलं.
