मुंबई: राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

एकूणच शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील आत्मविश्वासानंतर देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पक्षाला ३० नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापने सोपं नसल्याचं समोर आलं आहे. तसेच राजभवनात गेलेले राष्ट्रवादीच्या आमदारांना अजित पवारांनी अंधारात ठेवल्याने त्यांच्यावर देखील विश्वास किती ठेवावा अशी चर्चा राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये रंगली आहे. मात्र निवडणूक लागल्यास आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना पाडू असं सांगून शरद पवारांनी इशाराच दिला आहे. विशेष म्हणजे पहाटे अजित पवारांसोबत गेलेले काही आमदार शरद पवारांना भेटल्याने भाजपचा प्लॅन फिसकटून सर्वजण पुन्हा राष्ट्रवादीकडे परततील अशी शक्यता आहे.

पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आहे, असं स्टेटस सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअँपवर ठेवलं आहे. त्यामुळे पवार कुटुंबीयांमध्ये आता फुट पडल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी जे काही केलं त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणताही संबंध नसल्याचं सांगत तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं शरद पवार म्हणाले होते. दरम्यान, आपणही यापासून अनभिज्ञ असल्याचं म्हटलं होतं.

काल रात्रीपर्यंत सर्वकाही ठीक असताना अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली होती आणि तुम्ही माझा सोबत आहेत की शरद पवारांसोबत असे प्रश्न विचारले. त्यातील १२ जणांनी त्यांच्यासोबत राजभवनात उपस्थिती दाखवली. मात्र त्याच आमदारांनी पुन्हा शरद पवारांशी संपर्क साधल्याची बातमी हाती आली आहे. त्यामुळे अजित पवारांसोबत असणारे ते आमदार पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात आल्यास अजित पवार पुन्हा एकाकी पडतील अशी शक्यता वर्तविण्यात येते आहे.

मात्र परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचा फोन एवढ्या महत्वाच्या घडामोडीत बंद असल्याने ते फुटलेल्या आमदारांच्या गटात सामील झाले नाही ना असे राजकीय तर्क लावले जात आहे. मात्र तत्पूर्वी अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी केल्याचं वृत्त आहे.

तत्पूर्वी, मात्र इतिहासात तोडफोडीच्या राजकारणाचा अनुभव असलेल्या खासदार नारायण राणे यांना बोलावून फडणवीसांनी त्यांच्यावर सरकार स्थापनेच्या शक्यता तपासण्याची जवाबदारी टाकल्याचे वृत्त पसरले होते. त्यालाच अनुसरून आमदार नितेश राणे यांनी खासदार नारायण राणे यांचा फोटो ट्विट करत “अब आएगा मज़ा” असं ट्विट केलं होतं.

मात्र यावर अजित पवारांनी भाष्य केलं होतं. नारायण राणेंच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घ्यायचं हा प्रश्न आहे, सध्याच्या काळात सगळे आमदार पक्षासोबत राहतील, जर एखाद्या पक्षातील आमदार फुटला, त्याठिकाणी निवडणुका लागल्या तर ज्या पक्षाचा आमदार फुटला त्याच पक्षाचा उमेदवार उभा राहील आणि अन्य दोन पक्ष त्याला पाठिंबा देतील. जर असं झालं तर ३ पक्षाचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला कोणता माइकालाल हरवू शकत नाही असं आव्हान अजित पवार यांनी खासदार नारायण राणे यांना दिलं होतं.

अजित पवारांसोबत गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता: सविस्तर वृत्त