बारामती: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना ‘स्टेपनी’ म्हटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मात्र अजितदादांकडे थेट स्टिअरिंग व्हील दिलं आहे. आमच्या सत्तेचं ड्रायव्हिंग अजितदादांकडे आहे, असा खुशखुशीत डायलॉग उद्धव ठाकरेंनी बारामती दौऱ्यात मारला. अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बारामतीत उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अजित पवारांचंही स्वागत झालं. राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा बारामतीत हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होत आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, की गेल्या महिन्यात पवारसाहेबांनी प्रेमाने आणि आग्रहाने या प्रदर्शनाला येण्याचे आमंत्रण दिले होते. मुंबईतही अनेक प्रदर्शने भरतात, पण त्यातून साधले काय जाते हे कळत नाही. पण, येथे येऊन कळले की मी मोठ्या अनुभवाला मुकलो असतो. प्रात्यक्षिकांसह हे प्रदर्शन आहे. नुसते मोठ-मोठे तत्वज्ञान येथे दिले जात नाही. अभिमान वाटावे असे काम त्यांच्या कुटुंबियांनी करून दाखविले आहे. यामध्ये राजेंद्र पवार किंवा अजित पवार असतील. या जागी माळरान होते, त्याठिकाणी नंदनवन उभे करून दाखविले आहे. माझ्या शेतीमध्ये नव-नवे तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे.

बारामतीमध्ये ४ दिवस चालणाऱ्या कृषीप्रदर्शनाचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता आमिर खान यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शरद पवार यांनी संवाद साधला. यावेळी बोलण्याला सुरूवात करताच पवारांनी भाजपाच्या नेत्या नाव न घेता टोला लगावला. पवार म्हणाले, “अनेकांना वाटतं होतं की, मी निवृत्त होईल. पण, तसं घडलं नाही. महाराष्ट्रातील जनतेनं घडू दिलं नाही आणि मी काही अशात निवृत्त होणार नाही,” असं पवारांनी सांगताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली.

 

Web Title:  NCP President Sharad Pawar speech during Baramati Agriculture Exhibition.

अनेकांना वाटतं होतं की, मी निवृत्त होईन; पण तसं होणार नाही: शरद पवार