औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत ‘एमआयएम’ आणि शिवसेनेत झालेल्या लढतीत ‘एमआयएम’ने शिवसेनेचा पराभव केला होता. पण त्याच ‘एमआयएम’ने विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेला मदत केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे कशी असतील याची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेचे अंबादास दानवे हे विक्रमी ५२४ मतांनी ते निवडून आले. काँग्रेसचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांना केवळ १०६ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस, ‘एमआयएम’ सदस्यांनी दानवे यांना मतदान केल्याचे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. या विजयामुळे संघटनेच्या झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा एका अर्थाने गौरव झाला असल्याची भावना शिवसेनेसह भाजपमधील नेत्यांमध्येही आढळत आहे. शिवसेनेतील अंतर्गत वादाच्या पाश्र्वभूमीवर दानवे यांना उमेदवारी मिळणे आणि त्यांच्या विजयासाठी सर्व नेत्यांनी प्रयत्न करणे यात बरेच काही दडले आहे.

औरंगाबाद-जालना मतदारसंघातील विधान परिषेदच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले होते. त्यानंतर, सकाळी आठ वाजताच मतमोजणीला सुरुवात झाली. काही वेळातच अंबादास दानवेंच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळला. मतदानानंतरच कुठल्या पक्षाची किती मते फुटणार याची उत्सुकता मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्त्यांना लागली होती. अखेर, आजच्या निकालानंतर ही उत्सुकता संपुष्टात आली असून काँग्रेस, राष्ट्रवादीसह एआयएमआयमचीही मते फुटल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकांसाठी ६५७ पैकी ६४७ मतदान झाले होते. त्यापैकी दानवेंना ५२४ मते मिळाली असून आघाडीच्या कुलकर्णी यांना केवळ १०६ मेत मिळाली आहेत. तर, अपक्ष उमेदवार शाहनवाज खान यांना फक्त ३ मते मिळाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मते फुटल्याचं स्पष्ट झालं आहे.

काँग्रेसच्या नाही मात्र एमआयएमची मते फुटल्याच्या प्रश्नावर अंबादास यांनी नकारात्मकता दर्शवली. विशेष म्हणजे महायुतीच्या मतांपेक्षा फुटलेली १२६ अधिकची मतं दानवेंना मिळाली आहेत. मात्र वेळोवेळी हिंदुत्वाची ओरड करणारी शिवसेना राजकारणात विषय जेव्हा फायद्याचा येतो तेव्हा ते सर्व विचार बासनात गुंडाळतात हे अनेकवेळा सिद्ध झालं आहे आणि त्याचाच अजून एक प्रत्यय औरंगाबादच्या निवडणुकीत आला आहे जेथे निवडणूक कोणतीही असो मात्र मुद्दा कायम हिंदू मुस्लिम असाच असतो.

औरंगाबाद: राजकीय फायद्यासाठी एमआयएम’शी साटंलोटं करत निवडणूक जिंकून दाखवली