वाशीम: देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. ”महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर विस्तारच होत नव्हता. एका महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता सात दिवस झाले तरी खातेवाटप झालेले नाही. सगळ्यांना मलाईदार खाती हवी आहेत. आता खातेवाटप होण्यापूर्वीत त्यांच्या एका मंत्र्याने राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. कॅबिनेट मंत्री बनवू म्हणून आश्वासन देऊन राज्यमंत्री बनवल्याने अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे या सरकारच्या पतनाची सुरुवात सरकार बनण्याच्या आतच सुरू झाली आहे,” असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी खातेवाटपाआधीच राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात असून विरोधी पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष लगेचच सक्रिय झाला आहे. ‘आज अशा अनेक बातम्या मिळतील,’ असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

तसेच यावर भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पक्षाने कोणत्याही प्रकारची फुस लावल्याचा आरोप चुकीचा आहे. जैसी करनी वैसी भरनी असं सुचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देताच, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीत मोठी फूट पडणार असल्याचे सूतोवाच केलं आहे. भारतीय जनता पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर, आज दिवसभरा अशा बऱ्याच बातम्या येतील, असे म्हटले आहे. तर, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनीही, महाविकास आघाडीत नाराजी असल्याचं उघड झाल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे, भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडीतील नाराज आमदारांशी संपर्क साधण्यात येत असल्याचेही वृत्त समजते. दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया देताना मला याबाबत कल्पना नसल्याचे म्हटले आहे.

 

Web Title:  This is beginning fall Mahavikas Aghadi Government says Opposition Leader Devendra Fadnavis.

ही तर महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात: देवेंद्र फडणवीस