 
						Mukesh Ambani | उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे ई-मेल पाठवल्याप्रकरणी तेलंगणातील एका १९ वर्षीय तरुणाला मुंबईतील गामदेवी पोलिसांनी शनिवारी पहाटे अटक केली. ईमेलमध्ये स्वत:चे नाव शादाब खान असल्याचे सांगणाऱ्या आरोपीचे नाव गणेश रमेश वनपारधी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. आरोपीला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात अंबानी यांना पाच ई-मेल आले होते, ज्यात पाठवणाऱ्याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की, “ही काही किशोरवयीन मुलांनी केलेली गंमत असल्याचे दिसते. आमचा तपास सुरू असून आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू.
शादाब खानने 27 ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या पहिल्या ईमेलमध्ये लिहिले होते की, जर तुम्ही (अंबानी) आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारताचा सर्वोत्तम नेमबाज आहे.” यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि एमडी यांना आणखी एक ईमेल आला. यामध्ये मेल पाठवणाऱ्याने सांगितले की, त्याला आधी ईमेलला रिप्लाय मिळाला नाही, त्यामुळे आता तो २०० कोटी रुपयांची मागणी करत आहे. मागण्या मान्य न झाल्यास अंबानीयांना डेथ वॉरंट बजावण्यात येईल, असे दुसऱ्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.
सोमवारी खंडणीखोराने अंबानी यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर तिसरा ईमेल पाठवून ४०० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी त्यांना असे आणखी दोन ईमेल आले. पोलिसांनी सांगितले की त्यांनी ईमेलचा आयपी अॅड्रेस तपासला आणि आरोपीचा शोध घेतला, जो तेलंगणाचा असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात आणखी लोकांचा सहभाग आहे का, याचा शोध पोलिस घेत आहे.
तत्पूर्वी, मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी बिहारमधील दरभंगा येथून अटक केली होती. आरोपींनी मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी दिली होती.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		