 
						Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. भारत सरकारने आपल्या अंतरिम बजेटमध्ये प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली, आणि अनेक पॉवर सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स तेजीत आले. टाटा पॉवर कंपनीने शुक्रवारी सेबीला त्यांच्या सौर प्रकल्प आणि वित्त पुरवठा सेवासंबंधित माहिती दिली आहे.
टाटा पॉवर कंपनीने सेबीला कळवले की, त्यांच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर सोलर सिस्टीम्स लिमिटेड कंपनीने मागील 4.5 वर्षांमध्ये सौर प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी तसेच आपल्या ग्राहकांना वित्तीय सेवा प्रदान करण्यासाठी 3,500 कोटी रुपयेपेक्षा अधिक मूल्याची गुंतवणूक केली आहे. शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.45 टक्के वाढीसह 390.60 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
टाटा पॉवर कंपनीने माहिती दिली की, TPSSL या उपकंपनीने 2,200 पेक्षा जास्त व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना वित्त सेवा प्रदान केल्या आहेत. या प्रकल्पांचे मूल्य अंदाजे 3,400 कोटी रुपये आहे. यामध्ये अनिवासी ग्राहकांसाठी 850 मेगावॅट आणि निवासी ग्राहकांसाठी सुमारे 9 मेगावॅट क्षमतेचे ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहे.
TPSSL कंपनीने 1,000 पेक्षा जास्त ग्राहकांना गृह कर्ज सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. TPSSL कंपनीने अनेक सरकारी, खाजगी बँका आणि NBFC यांच्यासह 20 पेक्षा जास्त सक्रिय कर्जदात्यासोबत वित्तीय सहयोग करार केले आहेत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक ऑफ बडोदा, Tata Capital, Greenlance Energy, Ecofi, Credit Fair, Paytm यांसारख्या दिग्गज वित्तीय संस्था सामील आहेत.
1 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 396.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. डिसेंबर 2023 पर्यंत, टाटा पॉवर कंपनीच्या प्रवर्तकांनी 46.86 टक्के भाग भांडवल धारण केले होते. सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 53.14 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
प्रधानमंत्री सूर्योदय योजने अंतर्गत देशातील एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकेल, आणि त्यांना 15-18,000 रुपये लाभ देखील होईल. या नवीन योजनेच्या घोषणेनंतर अनेक ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		