मुंबई : अजित पवारांचा आदेश न मानल्यास अपात्रतेची कारवाई होईल, अशी भीती नवीन आमदारांना दाखवली जात होती. पण ते चुकीचे आहे. राष्ट्रवादीने अजित पवार यांना गटनेतेपदावरून दूर केले आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना पक्षादेश काढण्याचा अधिकारच उरलेला नाही, असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. अजित पवार यांनी पक्षादेश काढलाच तर त्यांच्याविरोधात मतदान करणाऱ्यांवर कसलीही कारवाई होणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

मात्र समोर आलेल्या अधिकृत माहितीवरून भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे असंच सत्य समोर आलं आहे. एनसीपीचे विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांचीच अधिकृत गटनेते म्हणून नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी सांगितले की, एनसीपीने विधिमंडळ गटनेतेपदाच्या निवडीचे पत्र सोमवारीे दिले आहे. त्यानुसार जयंत पाटीलच गटनेते असतील. त्यामुळे ते वा त्यांनी ज्यांची प्रतोद म्हणून निवड केली असेल त्यांचाच ‘व्हीप’ अधिकृत असतो. भागवत म्हणाले, विधिमंडळ गटनेत्याची निवड पक्षाचा अध्यक्ष वा सरचिटणीस करतो. निवडीची माहिती ३० दिवसांत विधानसभा अध्यक्ष वा विधान भवनाच्या सचिवांकडे द्यावी लागते. शिवसेनेने गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केल्याचे पत्र दिले आहे.

मात्र याची चुणूक स्वतः अजित पवारांना देखील लागल्याचे कालच्या घडामोडीवरून समोर आलं आहे. कारण राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला मदत करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार होते. परंतु, अजित पवार विधानभवनात पोहचले आणि पदभार न स्वीकारताच घरी परतले.

विशेष म्हणजे अजित पवार विधानभवनात पोहोचल्यानंतर राष्ट्रवादीचे दिग्गज नेतेही तिथे दाखल झाले. त्यानंतर अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांमध्ये तब्बल ४ तास बैठक चालली. ही बैठक संपताच अजित पवार यांनी पदभार न स्वीकारता घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी पुन्हा राष्ट्रवादीत येण्याचा मार्ग खुला ठेवला आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

धक्का! विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील हेच अधिकृत गटनेते अशी नोंद; त्यांचाच ‘व्हीप’ अधिकृत