मुंबई: आरेमधील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री आरेतील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरातील झाडं कापल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन करण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर या परिसरात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर कारशेडच्या जागेवरील झाडे तोडायला शुक्रवारी रात्रीच सुरुवात झाली. शुक्रवारी रात्रीत जवळपास चारशेहून अधिक झाडं कापल्याची माहिती स्थानिकांनी दिली. झाडे तोडण्याचं हे काम पोलीस सुरक्षेत सुरू होतं. वृक्षतोडीची माहिती समजाताच विविध ठिकाणाहून अनेक पर्यावरणप्रेमी कारशेडच्या बाहेर विरोधासाठी जमले. कारशेडच्या जागी कोणालाही प्रवेश नसल्यामुळे अनेकांनी बाहेर रस्त्यावरच ठिय्या दिला. ‘आरे’मध्ये रात्रभर तणावाचं वातावरण होतं.

आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी सुरू झालेल्या वृक्षतोडीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या विषयाचा अभ्यास करुन माहिती घेऊन योग्य वेळी बोलू, असं उत्तर ठाकरे यांनी दिलं. आरेचा विषय सोडणार नाही. झाडं तोडणाऱ्यांचं काय करायचं ते लवकरच ठरवू. त्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेऊन रोखठोक बोलू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आरेचा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. उद्धव यांनी आज धनगर, कुणबी, तेली, वंजारी समाजाच्या नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यानंतर आज आगामी निवडणुकीत शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करा असे त्यांनी यावेळी सर्व समाजाच्या नेत्यांना आव्हान केले. यावेळी त्यांनी आरेच्या मुद्दयावर जास्त बोलणे टाळले, मी आरे संदर्भात स्वतंत्र पत्रकारपरिषद घेणार असल्याचेही सांगत, निवडणूक संपल्यानंतर आमचे सरकार येणार आहे, त्यानंतर झाडं तोडणाऱ्यांचं काय करायचं? ते आम्ही ठरवणार असल्याचेही ते म्हणाले.

आरे विषयावर माहिती घेऊन योग्य वेळी बोलू: उद्धव ठाकरे