ठाणे : सोमवारी मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे दिवा नजिक येथे सुरू असलेल्या बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण उधळून लावत सरकारला थेट इशारा दिला होता. त्या आंदोलनात स्थानिक शेतकरी सुद्धा शामिल झाले होते. शीळ-डायघर पोलिसांनी मंगळवारी दुपार पासून या कारवाईला सुरुवात केली आहे.

शीळ-डायघर पोलिसांनी मंगळवारी दुपारी काही जणांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यातील २ शेतकऱ्यांसहित काही कार्यकर्त्यांना सोडून दिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनला दाखविलेल्या कडवट विरोधा नंतर ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी शीळफाटा येथे सुरू असलेल्या बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण सोमवारी अक्षरश: उधळून लावत जमीन मोजणीच्या मशीन सुद्धा फेकून दिल्या होत्या.

मनसेचे नेते राजू पाटील आणि ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या सह सर्व कार्यकर्ते परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या सात जणांमध्ये रवींद्र मोरे, मनविसे ठाणे शहर अध्यक्ष संदीप पाचंगे, मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे, उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे, शहर सचिव विनायक रणपिसे, प्रभाग अध्यक्ष जनार्दन खारीवले,कुशाल पाटील यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

सरकार शेतकऱ्यांचा विरोध धुडकावून दडपशाहीचा मार्ग आजमावत आहे. परंतु या दडपशाहीला मनसे कार्यकर्ते घाबरत नाही. स्थानिकांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांसाठी मनसेचे आंदोलन असेच सुरू राहणार आहे. तसेच बुधवारपासून हे आंदोलन गनिमी काव्याने केले जाईल असं ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं.

Taotal seven mns party workers arrested by police