मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सजावट आणि रोशनाई करण्यात आली आहे. राज्यात ठिकठिकाणी शिवजयंतीची मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची तयारी देखील जल्लोषात सुरू असल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिवनेरीवरही शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे.
असे थोर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती ही मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहेच. पण आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे आणि जागतिक दर्जाचे योद्धे म्हणूनही शिवरायांची ओळख आहे. यातील आणखी एक विशेष म्हणजे शिवाजी महाराज ज्यांच्याशी लढले त्यांनीही महाराजांचे श्रेष्ठत्व मान्य केले होते. त्यांच्यातील नेता, धुरंधर सेनानी, जाणता राजा ही आणि अशा असंख्य गुणांची ओळख समाजाला पदोपदी होत होती. महाराजांचा काळ लोटून इतकी वर्षं झाली तरीही त्यांचे इतिहासातील स्थान आणि मान याला जराही धक्का लागू शकत नाही. त्यांच्याबाबत जागतिक स्तरावर बोलल्या जाणाऱ्या गोष्टी भारतीयांसाठी खऱ्या अर्थाने अभिमानास्पद आहेत.
