मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मुंबईतील ईडी विभागीय कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, उद्या चौकशी नक्की किती वेळ होणार हे निश्चित सांगता येत नसलं तरी बाहेरील परिस्थिती बिघडणार नाही यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागलं आहे. काल पासूनच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी नोटीस बजावल्या होत्या.
दरम्यान, स्वतः राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आणि ईडी कार्यालयाबाहेर न जमण्याचे आवाहन केलं असलं पोलीस यंत्रणा कोणताही धोका पत्करण्याची मनस्थितीत नसल्याचं दिसत आहे. आज मुंबई आणि आजूबाजूच्या शहरातील बसेसला देखील कवच लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण ईडी कार्यालयाला मुंबई पोलिसांनी गराडा घातला असून संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली आहे.
उद्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण शहरात चोख पोलीस बंदोबस्त आज रात्रीपासूनच दिला जाणार आहे. दरम्यान, काही महत्वाच्या मनसे पदाधिकाऱ्यांवर देखील पोलिसांचं लक्ष असून उद्या त्यांना पुन्हा समज दिली जाऊ शकते. मात्र मनसे कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा संपूर्ण यंत्रणेला माहित असून राज ठाकरे यांच्यासाठी कार्यकर्ते कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि त्यामुळे पोलीस प्रशासन कोणतीही जोखीम उचलण्याच्या मनस्थितीत नाहीत. सरकार हे सूडबुद्धीने करत असल्याचा आरोप मनसेने केला असल्याने भाजप कार्यालयांना देखील अधिक सुरक्षा पुरवण्यात आली असल्याचं वृत्त आहे. एकूणच आज मनसेचा एकही आमदार किंवा खासदार नसला तरी दरारा मात्र अगदी बाळासाहेबांप्रमाणे असल्याचं नजरेस पडत आहे.
