नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार असून, सभेची तयारी पूर्ण झाली आहे. मोदी आणि फडणवीस यांच्यासह अर्ध्या मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत होत असलेल्या या जाहीर सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

दरम्यान, यापूर्वी नाशिक आलेल्या मोदींनी कांदा उत्पादकांना मोठं मोठी आश्वासनं भाषणातून दिली होती. मात्र सत्तेत आल्यापासून कांदा उत्पादकांची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं चित्र आहे. नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील सभेचा परिसर बुधवारीच एनएसजी कंमांडोंनी ताब्यात घेतला असून, संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

कांद्याच्या कोंडीने शेतकरी वर्गात संताप खदखदत असून त्याचा भडका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारच्या सभेत उडू नये आणि कांदा हे निषेधाचे हत्यार ठरू नये यासाठी या सभेत कांदा वा अन्य शेतमालाशी संबंधित वस्तूच नव्हे, तर पिशव्यादेखील आणण्यास मनाई करण्यात आली आहे.

देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर उंचावत असताना केंद्र सरकारने निर्यातीवर निर्बंध आणत पाकिस्तान, चीन अथवा इतर देशातून तो आयात करण्याची तयारी केल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष आहे. मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेवरही या असंतोषाचे सावट दिसून आले. या यात्रेचा समारोप गुरुवारी मोदी यांच्या सभेने होत असून त्यात कांद्याने राजकीय अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा सर्वतोपरी काळजी घेत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्यभर जनसंपर्क वाढवला आहे. केंद्रातील स्पष्ट बहुमताप्रमाणेच राज्यातही भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल, असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे अनेक नेते महाराष्ट्राच्या वाऱ्या करत आहेत. आता स्वतः पंतप्रधान मोदी देखील नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी उपस्थित राहणार आहेत.

विधानसभा: आज मोदींचा नाशिक दौरा; मात्र भाजपाला कांदाफेकीची भीती?