मुंबई : काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष आणि कट्टर हिंदुत्ववादविरोधी पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी- लोकसभा मतदारसंघातून सनातन समर्थक नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्यावर्षी नालासोपारा येथून वैभव राऊत या तरुणाला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती. तो सनातन संस्थेचा पदाधिकारी होता. त्याच्या घरातून २० देशी बॉम्ब आणि २ जिलेटीन स्टिक जप्त करण्यात आल्या होत्या. चौकशीनंतर आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. वैभवच्या घरापासून काही अंतरावरील त्याच्या दुकानात बॉम्ब बनवण्याचे सामान मिळाल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले होते. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक काही दिवसापासून त्याच्या मागावर होते. वैभव राऊत हा गोरक्षकही होता. हिंदु गोवंश रक्षा समितीत तो सक्रिय होता.
दरम्यान, वैभव राऊत याच्या अटकेनंतर त्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला होता. काँगेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी त्या मोर्चाचे नेतृत्व केले होते. वैभवला करण्यात आलेली अटक हे कारस्थान असून त्याला न्याय न मिळाल्यास यापेक्षाही मोठा मोर्चा काढू, असा इशारा त्यांनी दिला होता.
