बुलडाणा : बुलडाण्याच्या चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील आशा इंगळे या शेतकरी महिलेने स्वत:च्याच शेतात स्वत:ची चिता रचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नापिकी तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी जीव दिल्याचे वृत्त आहे. आशा इंगळे या ५५ वर्षांच्या होत्या. विशेष म्हणजे त्या गावच्या माजी सरपंच सुद्धा होत्या. त्यांच्याकडे साडेतीन एकर शेती होती. परंतु, नातेवाईक आणि इतर लोकांकडून घेतलेली कर्ज फेडता येत नसल्याने त्या प्रचंड तणावाखाली होत्या असं समजतं.

त्यांची दोन मुलं रोजंदारीने काम करून दैनंदिन उदरनिर्वाह करतात. आशा यांच्यावर ८०,००० रुपयांचे कर्ज होते जे त्यांना नापिकीमुळे फेडता येणे शक्य नव्हते. दरम्यान, यावर्षी सोयाबीनचे अत्यल्प उत्पन्न हाती आल्यानंतर त्यांनी काही पैसे चुकते केले होते. परंतु, नंतर आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होणार असल्याने मागील काही दिवसांपासून त्या प्रचंड नैराश्येत होत्या.

आशा यांच्या पतीचे २००८ मध्ये निधन झाले असून त्यांच्या एका मुलीचे लग्न झाले आहे. दरम्यान, दुष्काळामुळे यंदा आणखी परिस्थिती अतिशय बिकट होणार, असे त्यांना वाटत होते. त्यामुळेच बुधवारी रात्री आशा इंगळे यांनी स्वतःच्या शेतातील गोठ्यात स्वत: सरण रचून आत्महत्या केली. दरम्यान, सत्ताधारी केवळ “दुष्काळ सदृश्य” परिस्थिती असा शेरा मारून पुतळ्यांच्या आणि मंदिरांच्या विषयात मग्न झाल्याने शेतकऱ्यांना सुद्धा सत्ताधाऱ्यांकडून कोणतीही अपेक्षा उरली नसावी, त्यामुळे ते सरकार दरबारी मदतीची अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच स्वतःची चिता रचून मृत्यू पत्करणं सोपं समजत आहेत.

debt ridden drought farmer woman commit suicide in buldhana