27 July 2024 7:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

न्यायासाठी बळीराजाचा भाजप-शिवसेना सरकारविरोधात एल्गार; विधानसभेवर मोर्चा

ठाणे : आज सकाळी दहाच्या सुमारास ठाण्यातील आनंदनगरमधल्या चेकनाका इथून शेतकऱ्यांच्या भव्य मोर्च्याला सुरुवात झाली आहे. राज्यातील बळीराजा तसेच आदिवासी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी ठाणे शहर ते आझाद मैदान असे तब्बल ४५ किलोमीटरचे अंतर पार करून मुंबई विधानसभेवर धडक देणार आहेत. राज्यभरातील हजारो शेतकरी तीव्र दुष्काळ असताना दुष्काळाचे चटके सोसत एकत्र येत आहेत. आज सकाळपासूनच ह्या मोर्चाची सुरुवात “आनंद दिघे प्रवेशद्वार “येथील जुना चेकपोस्ट नाका येथून करण्यात आली. दरम्यान, यावेळी लोकसंघर्ष मोर्च्याच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी या मोर्चाचे प्रतिनिधित्व केले आहे.

तसेच या सभेचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे-पाटील असतील असं वृत्त आहे. दरम्यान, या मोर्चाला पाणीवाले बाबा राजेंद्र सिंह, कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, सुभाष वारे, स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि काळू राम काका दोधडे हे प्रमुख सर्व नेतेमंडळी पाहुणे म्हणून उपस्थित असतील आणि मार्गदर्शन सुद्धा करतील.

विशेष म्हणजे राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खान्देश, सांगली, सातारा ते ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आहेत. दरम्यान, आज पहाटे चार वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत कसारा रेल्वे स्थानकावरून तब्बल ८,००० ते १०,००० मोर्चेकरी विविध लोकलने ठाण्याच्या दिशेने रवाना झाले. तसेच या भव्य मोर्चात ५०,००० पेक्षा अधिक शेतकरी आणि आदिवासी मोर्चेकरी सहभागी होतील अशी माहिती प्रकाश बारेला यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x