नवी दिल्ली : भाजप’ने २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी २०१४ मधील घोषणेत बदल केल्याचे वृत्त आहे. २०१४ मधील ‘अबकी बार मोदी सरकार’ मधील ‘मोदी सरकार‘शब्द वगळून “अबकी बार ४०० के पार” अशी नवी घोषणा देण्याची योजना असल्याचे समजते. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. तत्पूर्वी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत एनडीएने तब्बल ३३६ जागांवर विजय प्राप्त केला होता. त्यावेळी एकट्या भाजपाने २८२ जागांवर विजय प्राप्त केला होता.
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांना एनडीए’चे पंतप्रधानपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करत ‘अबकी बार मोदी सरकार’ अशी घोषणा देत निवडणुका लढवल्या होत्या. दरम्यान पुन्हा भाजपचाच पंतप्रधान आणि ते सुद्धा मोदी अशी योजना असली तरी मूळ घोषणेतून ‘मोदी सरकार’ हटवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची इच्छा आहे. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीतील घोषवाक्यातून मोदी सरकार वगळण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०१९ मध्ये नक्की कोण पंतप्रधान होणार याबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे.
